देशसेवा करण्याची संधी मिळाली तर खासदार व्हायला आवडेल:श्रीजया चव्हाण यांच्या वक्तव्याने नांदेडच्या राजकारणात नवी खळबळ
![]()
नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण सध्या राजकीयदृष्ट्या अधिक सक्रिय होताना दिसत आहेत. अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना खासदार होण्याबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. देशसेवा करण्याची संधी मिळाली तर खासदार व्हायला नक्कीच आवडेल, असे स्पष्टपणे सांगत त्यांनी आपल्या भविष्यातील राजकीय आकांक्षांबाबत संकेत दिले आहेत. श्रीजया चव्हाण यांनी यावेळी अत्यंत संयत आणि सकारात्मक भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, आमचं कुटुंब नेहमीच देशसेवेसाठी तत्पर राहिलं आहे. लोकांनी संधी दिली तर मोठ्या पातळीवर काम करण्याची इच्छा आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भोकरपुरते मर्यादित न राहता राज्य आणि देश पातळीवर काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासात नवा टप्पा सुरू होणार का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. दरम्यान, त्यांच्या शेजारी उपस्थित असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही या विषयावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यांनी अत्यंत साध्या शब्दांत उत्तर देत म्हटले, तिची जी इच्छा असेल तेच तिने करावे. मी त्यात हस्तक्षेप करणार नाही. त्यांनी मुलीच्या निर्णयावर विश्वास दाखवत तिचा राजकीय प्रवास तिच्याच हाती सोपवल्याचे स्पष्ट केले. तसेच, पहिली टर्म अजून पूर्ण व्हायची आहे, असे सांगत त्यांनी थोडक्यात विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रीजया चव्हाण यांच्या वक्तव्याने नांदेडच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. चव्हाण कुटुंबाचा राजकीय वारसा आता विधानसभेपलीकडे जाऊन संसदेकडे वळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्येही या मुद्द्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. श्रीजया चव्हाण या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच निवडून आल्या. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून त्यांनी भोकर मतदारसंघातून काँग्रेसचे तिरुपती कोंढेकर यांचा पराभव करत प्रभावी विजय मिळवला. हा सामना राज्यभर चर्चेत राहिला होता. त्या प्रसिद्ध चव्हाण कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील नेत्या असून, त्यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत ठसा उमटवला. विकासाभिमुख राजकारणासाठी ओळख मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतलेल्या श्रीजया चव्हाण या विकासाभिमुख राजकारणासाठी ओळखल्या जातात. भोकरमध्ये शिक्षण, रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधा यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. तळागाळातील काम, युवक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतची बांधिलकी यामुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात त्या केवळ विधानसभा नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही आपली छाप पाडतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
