आम्हालाही दुखापत झाली:TMC खासदार युसूफ पठाण यांच्या नातेवाईकांचा दावा, पाण्याचे शिंतोडे उडाल्याने झाली होती मारहाण
![]()
भायखळा येथील मारहाण प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला युसूफ पठाण यांच्या नातेवाईकांवर शेजाऱ्यांशी हाणामारी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, आज पठाण यांच्या सासरच्या मंडळींनी समोर येत या वादात त्यांचेही लोकांना कशी दुखापत झाली, याचे पुरावे सादर केले आहेत. “आम्ही सुरुवातीला माफी मागितली होती, तरीही आमच्यावर हल्ला करण्यात आला,” असा आरोप युसूफ पठाण यांच्या नातेवाईकांनी केला आहे. शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. युसूफ पठाण यांच्या सासरच्या कुटुंबातील युसूफ खान हे कारने घरी परतत होते. रस्त्यावरील एका खड्ड्यात चाक गेल्यामुळे गलिच्छ पाणी बाजूला उभे असलेल्या शोएब खान याच्या अंगावर उडाले. पठाण यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, “युसूफ खान यांनी तातडीने गाडी थांबवून शोएबची माफी मागितली होती. मात्र, शोएबने माफी स्वीकारण्याऐवजी शिवीगाळ सुरू केली. इतकेच नाही, तर त्याने बांबूच्या काठीने कारची काच फोडली आणि युसूफ खान यांच्यावर हल्ला चढवला.” पोलिस स्टेशनला जाताना आम्हाला अडवले युसूफ पठाण यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, जेव्हा ते या पहिल्या हल्ल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाले होते, तेव्हा वाटेतच दुसऱ्या गटाने त्यांना पुन्हा अडवले. तिथे दोन्ही गटांत पुन्हा शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे रूपांतर फ्री-स्टाईल हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही बाजूंकडून लाठ्या आणि बेसबॉल बॅटचा वापर झाला असून, यात केवळ तक्रारदारच नाही तर पठाण यांच्या बाजूचे लोकही रक्तबंबाळ झाले आहेत, असे त्यांनी सादर केलेल्या व्हिडिओ पुराव्यातून दिसत आहे. युसूफ पठाणच्या सासऱ्यांना अटक या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत युसूफ पठाण यांचे सासरे खालिद खान, त्यांचा मुलगा उमरशाद आणि एका नातेवाईकाला अटक केली आहे. मात्र, पोलिसांनी समोरील गटाने केलेल्या मारहाणीचा विचार करावा, कारण हा वाद केवळ एका बाजूने चिघळलेला नाही, असे युसूफ पठाण यांच्या सासरच्या मंडळींचे म्हणणे आहे. भायखळा पोलिसांनी सध्या दोन्ही गटांचे जबाब आणि पुरावे ताब्यात घेतले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या हिंसक वळणाला नेमके जबाबदार कोण, याचा शोध सुरू केला आहे.
