मोबाइलपासून पालकांनी विद्यार्थ्यांना दूर ठेवणे गरजेचे:मंठा येथील पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांचे प्रतिपादन
![]()
मोबाईलचा अतिरेक लहान मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव निर्माण करतो. मानसिक तणाव वाढतो. सोशल आयसोलेशन होते. शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. ‘मोबाईल ही सोय आहे, गरज होऊ नये,’ अशी जाणीव पालक व शिक्षकांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. मुलांमधील मोबाईलचे व्यसन कमी करण्यासाठी पालकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे मत पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांनी व्यक्त केले. अशोका पब्लिक स्कूलमध्ये पालक मेळावा व ग्रॅज्युएशन डे कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष संजयकुमार चव्हाण होते. देशमुख म्हणाले, बालवयात योग्य दिशा देणे गरजेचे आहे, सुसंस्कार, शिस्त, वाचनाची सवय, प्रत्यक्ष अनुभव यातून व्यक्तिमत्त्व घडते, लहान वयात तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर करावा. अभ्यास व संस्कारांवर लक्ष केंद्रित करावे, असे सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आयएएस श्रेया एक्झाममध्ये यश मिळवले. वेदिका ज्ञानेश्वर जाधव २८६, अनया प्रसाद काळे २८२ गुण मिळवले. सूत्रसंचालन वंदना मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सविता राठोड, प्रियंका चिंचणे, स्वाती हिवाळे, धनश्री काकडे, अश्विनी चंदेल, आकांक्षा खरात, शितल कुटारे, प्रणिता दळवी, ज्योती शहाणे यांनी सहकार्य केले.यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा केला मान्यवरांनी सत्कार या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वार्षिक पारितोषिक वितरणही करण्यात आले. प्री-प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ विशेष आकर्षण ठरला. प्री-प्रायमरीतून प्राथमिक स्तरात प्रवेश देत शैक्षणिक पायाला भक्कम आधार देण्यावर भर देण्यात आला.
