अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाची पहाटे मोठी कारवाई
नांदेड – सोमवारी पहाटे अवैध वाळू उत्खनन प्रकरणात महसूल प्रशासनाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणारे तीन इंजिन व एक बोट जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट करून उद्ध्वस्त करण्यात आले. जप्त व नष्ट करण्यात आलेल्या साहित्याची अंदाजे किंमत सुमारे १३ लाख रुपये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वात मौजे भनगी येथे करण्यात आली. अवैध वाळू उपशामुळे नदीपात्राचे होणारे नुकसान, पर्यावरणीय हानी तसेच शासनाच्या महसुलाचे होणारे नुकसान लक्षात घेता प्रशासनाने कठोर भूमिका घेत ही धडक कारवाई केली. या मोहिमेत नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, मंडळ अधिकारी श्रीकृष्ण येलमाटे, कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, शिवानंद स्वामी, सय्यद मोसीन तसेच ग्राम महसूल अधिकारी मनोज सारपे, मनोज जाधव, गजानन होळगे, रमेश गिरी, राजेश बरोडा, महेश जोशी, गोपीनाथ कल्याणकर, पोलीस कर्मचारी श्री नागरगोजे आणि महसूल सेवक बालाजी सोनटक्के यांनी सहभाग घेतला. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील काळातही अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महसूल विभागाने दिला आहे.

Post Views: 175
