उष्णतेचा कहर:सोयगावचा पारा 42 अंशांवर, खबरदारी म्हणून ग्रामीण रुग्णालयांत उष्माघात कक्ष सज्ज
![]()
तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा कडाका झपाट्याने वाढू लागला आहे. शुक्रवारी (१७ एप्रिल) तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. वाढत्या उन्हामुळे निर्माण होणारा आरोग्याचा धोका लक्षात घेता, आरोग्य विभागाने सोयगाव उपजिल्हा रुग्णालयासह तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तातडीने उष्माघात उपचार कक्ष कार्यान्वित केले आहेत. मार्च महिन्यात दोनदा झालेल्या अवकाळी पावसानंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. उष्माघाताचा त्रास होणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. जरंडी, बनोटी व सावळदबारा या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. एकूण ८ बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. शहरातील “आपला दवाखाना’ येथेही लवकरच असा कक्ष सुरू केला जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीतेश चावडा यांनी दिली. उन्हाचा पारा वाढल्याने सोयगाव बसस्थानकासमोरील रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी होत असल्याची स्थिती आहे. चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, स्नायूंना गोळे येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, उलट्या, थकवा, श्वासोच्छ्वास वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे. शरीराचे तापमान १०५ अंश फॅरेनहाइटपर्यंत पोहोचणे. ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत. रुग्णांसाठी एसी, कूलर आणि पंख्यांची स्वतंत्र व्यवस्था. ओआरएस, आयव्ही फ्लुइड्स, तातडीची औषधे आणि डिजिटल थर्मामीटर, रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी कोल्ड पॅक्स, थंड पाणी आणि बर्फाची उपलब्धता करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांकडून ग्राहकांसाठी पाण्याची सोय उन्हाचा तडाखा वाढल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी स्वखर्चातून “ग्रीन नेट'(हिरवे कापड) लावून कृत्रिम सावली केली आहे. तसेच ग्राहकांसाठी पिण्याच्या शुद्ध व थंडगार पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. उष्माघात रुग्ण आढळल्यास काळजी घ्या ^तापमान वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. उष्माघाताचा रुग्ण आढळल्यास त्याला त्वरित सावलीत बसवून शरीरावर थंड पाणी टाकावे. प्रकृती गंभीर वाटल्यास विलंब न करता रुग्णालयात दाखल करावे. याठिकाणी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. -डॉ. दिनाजी खंदारे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, सोयगाव
