लोकसभा-विधानसभेत 33% आरक्षण समर्थनार्थ करमाडमध्ये महिलांची रॅली
![]()
लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ करमाडला शुक्रवारी आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिलांची रॅली काढण्यात आली. महिलांच्या भजनी मंडळाचा गजर झाला, घोषणांनी करमाड गाव दणाणून गेले होते. नारीशक्ती वंदना अधिनियमाला पाठिंबा देण्यासाठी फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघाली. रॅलीत आणि नंतरच्या कार्यक्रमात जि. प. उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, शिक्षण व आरोग्य सभापती अनिता मोठे, जि. प. सदस्य पुष्पा काळे, साधना कुलकर्णी, जयश्री पवार, पंचायत समिती सदस्य गीता कोरडे, चारुशीला गावंडे, भाजप प्रदेश सचिव रेखा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून रॅलीला सुरुवात झाली. सुरुवातीला जय हनुमान महिला भजनी मंडळ होते. त्यामागे विविध वेशभूषांतील केंद्रीय प्राथमिक शाळा, न्यू हायस्कूलच्या विद्यार्थिनी होत्या. त्यानंतर महिलांच्या घोळक्यात आमदार अनुराधा चव्हाण स्वतः घोषणा देत सहभागी झाल्या. रॅली महात्मा जोतिबा फुले चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, महादेव मंदिर मार्गे श्रीराम मंदिर चौकात पोहोचली. तेथे रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. अंगणवाडी सेवेत उत्कृष्ट काम करून राज्यस्तरीय पुरस्कार मिळवलेल्या सुपरवायझर सुनीता परदेशी, अंगणवाडी सेविका अनिता तारो, जय हनुमान मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती काळे यांचा सन्मान करण्यात आला. आमदार अनुराधा चव्हाण, जितेंद्र जयस्वाल, रेखा कुलकर्णी, डॉ. जिजा कोरडे, पुष्पा काळे, दत्ता उकर्डे यांनी सभेला संबोधित केले. कार्यक्रमासाठी सय्यद कदीर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल उकर्डे, दादाराव कुलकर्णी, रवी कुलकर्णी, रामेश्वर सोळुंके यांनी पुढाकार घेतला.
