संजय राऊतांकडे पुरावे असतील तर समोर आणावेत:रामदास आठवलेंचा थेट आव्हान, म्हणाले – खासदार स्वेच्छेने NDA मध्ये येत आहेत




शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांच्या कथित फुटीवरून सुरू असलेल्या वादात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या आरोपांवर पलटवार केला आहे. खासदारांना पैशांचे आमिष दाखवून फोडण्यात आल्याचा दावा फेटाळून लावत, राऊत यांच्याकडे पुरावे असतील तर ते सार्वजनिक करावेत, असे खुले आव्हान त्यांनी दिले. गेल्या दोन दिवसांत संजय राऊत यांनी “ऑपरेशन टायगर” अंतर्गत बंडखोर खासदारांना कोट्यवधी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा केला आहे. काही खासदारांना आधी 5 कोटी आणि नंतर आणखी 10 कोटी रुपये दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र, शिंदे गट आणि महायुतीतील नेत्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आठवले यांनीही त्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. राऊतांच्या आरोपांत तथ्याचा लवलेश नाही गुजरातमधील राजकोट येथे पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले म्हणाले, “संजय राऊत करत असलेल्या आरोपांमध्ये तथ्याचा लवलेशही नाही. जर त्यांच्याकडे आर्थिक व्यवहारांचे कोणतेही पुरावे असतील, तर ते समोर आणावेत.” बिनबुडाचे आरोप करून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. खासदार स्वेच्छेने NDA मध्ये येत आहेत रामदास आठवले यांनी दावा केला की, शिवसेना आणि इतर विरोधी पक्षांतील काही खासदार राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबत येत आहेत, त्यामागे कोणताही दबाव किंवा आर्थिक व्यवहार नाही. “हे खासदार स्वतःच्या इच्छेने NDA मध्ये येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे.” असे ते म्हणाले. आठवले म्हणाले की, देशभरात अनेक राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत. त्यामुळे काही खासदार आणि नेते NDA मध्ये येत असतील, तर त्याला “घोडेबाजार” असे म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी सूचित केले. पश्चिम आशियातील तणावावरही भाष्य राजकीय विषयांव्यतिरिक्त रामदास आठवले यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवरही प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मते, सध्या संघर्ष कमी होत असल्याची चिन्हे दिसत असली तरी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याची गरज आहे. “संघर्ष कमी होत असेल तर ती सकारात्मक बाब आहे. मात्र भविष्यातील कोणतीही आक्रमक भूमिका जागतिक स्तरावर नवे संकट निर्माण करू शकते.” असे ते म्हणाले. पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्यास त्याचा परिणाम इंधन बाजारावर होऊ शकतो, असेही रामदास आठवले यांनी सांगितले. त्यांच्या मते, “भूराजकीय तणाव कमी झाल्यास देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.” यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो, असे ते म्हणाले. NEET पेपरफुटीवर चिंता अलीकडील NEET पेपरफुटी प्रकरणावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, “ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र दरम्यान, महाराष्ट्रात सहा खासदारांच्या बंडामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाकडून अपात्रतेची कारवाई करण्याची तयारी सुरू असताना, महायुतीतील नेते हे खासदार स्वेच्छेने भूमिका बदलत असल्याचा दावा करत आहेत. यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला कायम असून, पुढील काही दिवसांत या संघर्षाला आणखी वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *