![]()
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे खाद्यपदार्थाचे नमुने घेण्यासाठी आलेले अन्न व आवश्यक प्रशासनाचे अधिकारी गुरुवारी ता १८ दाखल झाले. मात्र एकही नमुना न घेता अधिकाऱ्याचे पथक रिकाम्या हाताने परत गेले आहे. या प्रकाराची सेनगावमध्ये चांगली चर्चा सुरू होती. राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या अन्न व औषध प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी छापे टाकून कारवाईच्या धडाका सुरू केला. हिंगोली जिल्ह्यातही केवळ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारे अधिकारी आता किमान दोन-चार दिवस आड करून हिंगोली जिल्ह्यात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय असते याची माहिती आता जिल्ह्यातील नागरिकांना होऊ लागली आहे. एकीकडे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तक्रारीसाठी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले असताना, दुसरीकडे मात्र हिंगोली जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपला संपर्क क्रमांक कोणालाही देऊ नये अशी सक्त सूचनाच कार्यालयाला दिली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. दरम्यान मागील आठवड्यात हिंगोली येथे एका मोठ्या दुकानावर जाऊन अधिकाऱ्यांनी गव्हाच्या पिठाचे काही नमुने तपासणीसाठी घेतले. याशिवाय इतर 45 नमुने देखील तपासणीसाठी घेऊन प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. मात्र सदर कारवाई बाबत कोणालाही थांगपत्ता लागू देण्यात आला नाही. त्यामुळे या कारवाईबद्दलही उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आज अन्न व औषध प्रशासनाचे अधिकाऱ्यांचे पथक सेनगाव येथे दाखल झाले, तर दुसरे पथक वसमत येथे गेले होते. मात्र सेनगाव येथे दाखल झालेल्या पथकाच्या माहितीनंतर अनेकांनी दुकाने बंद केली. त्यामुळे सेनगाव येथे तीन ते चार तास थांबलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाला रिकाम्या हातानेच परतावे लागले आहे. मात्र वसमत येथे गेलेल्या पथकाने दोन ठिकाणी तपासणी करून खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कढईमधील तेलाचे दोन नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. दरम्यान उशिरा का होईना अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जाग आल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना भेसळमुक्त खाद्यपदार्थ खायला मिळतील असे बोलले जात आहे.
'तुकाराम मुंढे पॅटर्न'चा धसका!:सेनगावमध्ये 'एफडीए'ची धाड पडताच व्यापाऱ्यांनी दुकाने केली बंद; अधिकारी रिकाम्या हाताने परतले
