डॉ.बाबासाहेबांचे विचार हे क्रांतिकारी व मानवतावादी होते-ॲड. विजय गोणारकर

0
IMG_20260417_184829

कंधार- मुरलीधर थोटे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होय. त्यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रांत आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने दीन, दलित, विस्थापित आणि शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. त्यांनी सामाजिक, राजकीय आणि बौद्धिक क्रांती घडवून आणली. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजरचना उभी करण्याचे महान कार्य त्यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्येक विचार हे क्रांतिकारी व मानवतावादी असल्याचे प्रतिपादन विचारवंत ॲड. विजय गोणारकर यांनी केले.

       कंधार येथे अभिवक्ता संघाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी न्यायालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ॲड. दिलीप कुरुडे अध्यक्षस्थानी होते. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप, अभिवक्तासंघाचे अध्यक्ष ॲड. बी. के. पांचाळ, सचिव ॲड. कलीम अन्सारी, जयंती महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. मारोती पंढरे, ॲड. प्रफुल्ल शेंडगे, ज्येष्ठ अँड.हफिज घडीवाला, श्रेयस धर्मापुरीकर,सुहास मस्के,महिला प्रतिनिधी ॲड.सुप्रिया उमरजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोणारकर पुढे म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी दिवस-रात्र एक करून देशाचे संविधान तयार केले. प्रत्येकाच्या मनात आपल्या धर्मग्रंथाबद्दल श्रद्धा असते, मात्र राष्ट्राचा आचारग्रंथ म्हणून संविधानाला मान्यता देणे अत्यंत आवश्यक आहे. संविधान हेच देशाच्या एकात्मतेचे व प्रगतीचे प्रमुख साधन आहे असे स्पष्ट करून त्यांनी  डॉ. आंबेडकरांनी देशाला संसदीय लोकशाही प्रणाली दिली, ज्यामुळे लोकशाही मूल्यांची पायाभरणी अधिक मजबूत झाल्याचे नमूद केले. ॲड. एम. जी. सोनकांबळे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. डी. पी. गायकवाड यांनी सूत्रसंचलन केले तर ॲड. रवी केंद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *