Akshaya Tritiya 2026 | अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीची सुवर्णसंधी! ‘हा’ आहे गुंतवणुकीसाठी सर्वात शुभ मुहूर्त
Akshaya Tritiya 2026 | हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सोनं-चांदी (Gold Silver) खरेदी करणे, दानधर्म करणे किंवा नवीन उपक्रम सुरू करणे विशेष फलदायी ठरते. 2026 साली हा सण 19 एप्रिल रोजी साजरा होणार असून, या दिवशी केलेल्या प्रत्येक शुभ कार्याला कायमस्वरूपी लाभ मिळतो, अशी श्रद्धा आहे.
वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. यंदा ही तिथी 19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजून 49 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि 20 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजून 49 मिनिटांपर्यंत कायम राहणार आहे. परंपरेनुसार 19 एप्रिललाच मुख्य सण साजरा केला जाईल, मात्र 20 एप्रिललाही उदय तिथीनुसार काही काळासाठी शुभ योग राहणार आहे. (Akshaya Tritiya 2026)
सोनं किंवा चांदी खरेदीसाठी 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 नंतर संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. त्यामुळे या वेळेत कोणत्याही वेळी खरेदी करता येते. याशिवाय, 20 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजून 51 मिनिटांपासून ते सकाळी 7 वाजून 27 मिनिटांपर्यंतही खरेदीसाठी उत्तम मुहूर्त उपलब्ध आहे.
Akshaya Tritiya 2026 | अक्षय्य तृतीयेचे धार्मिक महत्त्व :
अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2026) हा सण हिंदू परंपरेतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. ‘अक्षय्य’ या शब्दाचा अर्थ कधीही न संपणारे किंवा ज्याचा नाश होत नाही असा होतो. त्यामुळे या दिवशी केलेली पूजा, दान, किंवा आर्थिक गुंतवणूक दीर्घकाळ लाभदायक ठरते, अशी श्रद्धा आहे.
याच कारणामुळे अनेकजण या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे, सोनं-चांदी खरेदी करणे किंवा इतर शुभ कार्यांची सुरुवात करतात. या दिवशी केलेल्या कृतींमुळे आयुष्यात समृद्धी आणि यश येते, असे मानले जाते.
