![]()
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांविरोधात राज्यभर कारवाईचा धडाका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काही भामटे स्वतःला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी म्हणून भासवून व्यापारी व व्यावसायिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार गुरुवारी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथे उघडकीस आला. एका व्यक्तीने स्वतःला अन्न व औषध प्रशासन विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत हॉटेल, पानटपऱ्या तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे जाऊन तपासणीच्या नावाखाली नमुने व छायाचित्रे घेण्यास सुरुवात केली. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने काही व्यावसायिकांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी तो अधिकृत अधिकारी नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचा बनाव उघड झाला. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती काही ठिकाणी जाऊन ‘तुमच्यावर कारवाई होऊ शकते’ अशी भीती दाखवत पैशांची मागणी करत होता. एका पानटपरी चालकाकडे तब्बल ७०० रुपयांची मागणी करून कारवाईची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, चौकात उपस्थित नागरिकांनी त्याला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्तीने तेथून पळ काढला. या घटनेनंतर शेलूबाजार बाजारपेठेत अन्न व औषध प्रशासन विभागाची धाड पडल्याची चर्चा काही काळ रंगली होती. मात्र प्रत्यक्षात तो बनावट अधिकारी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर व्यापारी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. नागरिकांनी अशा तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही शंका आल्यास संबंधित व्यक्तीचे ओळखपत्र तपासून खात्री करावी तसेच तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे सांगितले जात आहे.
शेलूबाजार येथे तोतया अन्न प्रशासन अधिकाऱ्याचा पर्दाफाश:कारवाईच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून पैशांची मागणी, नागरिकांकडून चोप
