"गुड बाय माय लव्ह…":ती आपल्या मनात कायम जिवंत राहील- जनाई भोसले; आशाताईंच्या नातीची हृदयस्पर्शी पोस्ट
![]()
आपल्या सुमधुर आवाजाने शतकानुशतके रसिकांच्या मनावर गारुड घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची वार्ता चटका लावून जाणारी असून, त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंना निरोप देताना त्यांची नात जनाई भोसले प्रचंड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. जनाईने इंस्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. जनाईने लिहिले, “भावनांनी पूर्णपणे भरून गेले आहे, वेळ मिळेल तेव्हा काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करेन. पण मला इतकंच सांगायचं आहे की आज इतक्या लोकांनी तिला मान दिला, सन्मान केला आणि तिच्यावर अफाट प्रेम व्यक्त केलं. तुमचे मनापासून आभार. ती खरोखरच या प्रेमास पात्र होती. मला जाणवत राहतं की ती आपल्या प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत राहतील आणि वरून हे सगळं तिने पाहिलं आहे.” गुड बाय माय लव्ह, लव्ह ऑफ माय लाइफ’ असे लिहीत जनाईने आपल्या आजीला अखेरचा निरोप दिला आहे. जनाई भोसले ही ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या धाकट्या मुलाची, म्हणजेच आनंद भोसले यांची कन्या असून, तिचा जन्म 2002 मध्ये मुंबईत झाला. स्वित्झर्लंडमधील प्रतिष्ठित ‘इन्स्टिट्यूट ले रोजी’ येथून आपले उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर, जनाईने आता आपल्या आजीचा समृद्ध सांगीतिक वारसा पुढे चालवण्याचे ठरवले आहे. आपल्या मधुर आवाजाच्या जोरावर ती सध्या संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत असून, आजीच्या पावलावर पाऊल ठेवत ती रसिकांची मने जिंकताना दिसत आहे.
