हिंगोलीतून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना पकडले:5 गुन्हे उघडकीस, इनोव्हा कारसह 9 लाखांचा मुद्देमाल जप्त
![]()
हिंगोली शहरासह जिल्हाभरातून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ता. 14 अटक केली आहे. त्यांच्याकडून इनोव्हा कार सह 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांनी जिल्हयातील पाच गुन्हयांची कबुली दिली आहे. या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध सुरु करण्यात आला आहे. हिंगोली शहरासह जिल्हाभरात मागील काही दिवसापासून जनावरे चोरीच्या घटना घडल्या आहेत. शेतातील आखाड्यावर कोणाही नसल्याचा गैरफायदा घेत जनावरे पळविली जात होती. तर हिंगोली शहरात मागील आठवड्यात दोन ठिकाणी जनावरे चोरी झाली होती. एका ठिकाणी गायीला इंजेक्शन देऊन पळविण्याच्या प्रयत्नात गाय दगावली. त्यामुळे चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले होते. यामध्ये उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार शेख शकील, सतीष जाधव, लिंबाजी वाहुळे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आझम प्यारेवाले, शंकर हरळ यांचा समावेश होता. या पथकाने रात्रीच्या वेळी शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांचे सीसीटीव्ही फुटेज काढून संशयीत वाहनांची माहिती घेतली. त्यानंतर या पथकाने मिळविलेल्या माहितीमध्ये नांदेड येथील जनावरे चोरणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून या पथकाने नांदेड येथे जाऊन अलीम अनिस शेख (रा. कल्याण मुंबई, ह. मु. लेबर कॉलनी नांदेड), सय्यद समीर अहेमद (रा. लेबर कॉलनी नांदेड) यांना अटक केली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने इनोव्हा कारमध्ये टाकून जनावरे पळविल्याची कबुली दिली. पोलिसांनी कार व रोख रक्कम असा 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात त्यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यांतर्गत एक, कळमनुरी पोलिस ठाण्यांतर्गत दोन, सेनगाव व आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत जनावरे चोरीचा एक गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या साथीदारांचा शोध सुरु केला आहे.
