पहिल्याच दिवशी मोठी कारवाई; 1 लाख 17 हजार 642 रुपयांचा गुटखा जप्त
नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व घातक शस्त्रांविरोधात विशेष मोहीम
नांदेड (प्रतिनिधी) : आगामी सण-उत्सव व कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व घातक शस्त्रांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली 11 ते 25 एप्रिल 2026 दरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. गुटखा व अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत दोन गुन्हे दाखल करून 1 लाख 17 हजार 642 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तसेच घातक शस्त्रांविरोधातील कारवाईत शस्त्र अधिनियमांतर्गत 11 गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत 57 हजार 822 रुपयांच्या तलवारी व खंजिर जप्त करण्यात आले असून एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुटखा, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ, अंमली पदार्थ व घातक शस्त्रांविरोधात ही विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संबंधित गुन्ह्यांवर भारतीय न्याय संहिता, एनडीपीएस कायदा व शस्त्र अधिनियमांतर्गत कठोर कारवाई केली जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी ‘खबर’ हेल्पलाइनचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 9150100100 या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅप द्वारे माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Post Views: 9
