भेसळखोरीविरोधातील कारवाईला वेग; नांदेडमध्येही चर्चांना उधा

नांदेड | प्रतिनिधी

राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळखोरीविरोधात सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे भेसळखोर आणि बेकायदेशीर व्यवसायांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. दूध, पनीर, मिठाई तसेच इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

अनेक वर्षांपासून भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. सध्या सुरू असलेल्या कारवायांमध्ये भेसळीचा माल जप्त करणे, संबंधित आस्थापनांवर छापे टाकणे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करणे यामुळे कायद्याची भीती निर्माण होत असल्याचे नागरिकांचे मत आहे.

दरम्यान, संभाजीनगर येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर या कारवायांमुळे काही हितसंबंधी अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे. मात्र प्रशासनाने कारवाईचा वेग कायम ठेवला असून, नागरिकांकडून या मोहिमेला पाठिंबा मिळत आहे.

नांदेड शहरात अलीकडेच एका औषध विक्री केंद्रावर झालेल्या कारवाईनंतर काही पानटपऱ्या, दूध डेऱ्या आणि बेकरी काही काळ बंद असल्याचे दिसून आले. यामागे तपास आणि कारवाईची धास्ती असल्याची चर्चा शहरात रंगली, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

याचबरोबर काही दिवसांपूर्वी अर्धापूर पोलिसांनी गुटखा प्रकरणात केलेल्या कारवाईचीही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. संबंधित प्रकरणात काही चौकशी झाल्याची माहिती समोर येत असली तरी अधिकृत स्तरावर याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

नागरिकांचे मत आहे की, भेसळखोरीविरोधात ज्या कठोरतेने कारवाई सुरू आहे, त्याच निष्पक्षतेने गुटखा, अवैध व्यापार आणि इतर गैरप्रकारांचीही चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी. सत्य जनतेसमोर येणे आणि कायद्याचे राज्य कायम राहणे हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून, प्रामाणिक व्यावसायिक व शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे भेसळखोरीविरोधातील मोहिमेला समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सध्या नांदेडमध्ये भेसळखोरी, गुटखा आणि आरोग्याशी संबंधित गैरप्रकारांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत असून, प्रशासनाने या मोहिमेचा विस्तार करून संपूर्ण साखळी उघडकीस आणावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *