हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी:डेक्कन पोलिसांनी दोघांना केली अटक; बनावट मेसेज दाखवून मोबाईल खरेदी
![]()
पुणे शहरात डेक्कन पोलिसांनी हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. एका तरुणाला मारहाण करून त्याच्या फोनपे खात्यातून पैसे काढून घेण्यात आले होते. निखील संदीप जाधव (वय २०, रा. जनता वसाहत) आणि ओंकार रमेश गरुड (वय २१, रा. गंजपेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नागेश हनुमंत पाटील (वय २१, रा. सदाशिव पेठ) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नागेश पाटील हे त्यांच्या मावस बहिणीसोबत पायी जात असताना नदीपात्रातील पुलावर दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांना अडवले. लोखंडी हत्याराचा धाक दाखवून त्यांच्या मोबाईलमधून फोनपेद्वारे एक हजार रुपये ट्रान्सफर केले आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन. पाटील करत आहेत. बनावट मेसेज दाखवून मोबाईल खरेदी दरम्यान, शहरात फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. दुकानदाराला बनावट मेसेज दाखवून १ लाख ३५ हजार रुपयांचा मोबाईल खरेदी केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फारुख अत्तार शेख (वय ३७, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार आदित्य विनोद गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार फारुख शेख हे कोंढव्यातील आर. आर. कम्युनिकेशन या मोबाईल विक्री दुकानात काम करतात. आरोपी गायकवाडने सॅमसंग कंपनीचा अल्ट्रा २६ हा मोबाईल खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. ऑफरमध्ये तो १ लाख ३४ हजार ९९९ रुपयांना असल्याचे सांगण्यात आले. गायकवाडने मोबाईल शॉपीच्या बँक खात्यावर एनईएफटीद्वारे पैसे पाठवल्याचे सांगत, एका तासात पैसे जमा होतील असा बनावट मेसेज दाखवला. यामुळे तक्रारदारांनी त्याला मोबाईल दिला. मात्र, पैसे जमा न झाल्याने आणि गायकवाडने वेगवेगळी कारणे दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. खोपडे करत आहेत.
