अमोल मिटकरींकडून 'जस्टिस फॉर दादा' आंदोलनाची हाक:अजित पवारांसाठी आमदारांच्या प्रतिसादाअभावी व्यक्त केली खंत
![]()
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला अडीच महिने उलटूनही तपासाचे सत्य अद्याप समोर आले नसल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. “अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी मी एकटाच पायऱ्यांवर बसलो, पण दुर्दैवाने इतर आमदारांची हवी तशी साथ मिळाली नाही,” अशी खंत व्यक्त करत अमोल मिटकरींनी आता ‘जस्टिस फॉर दादा’ (Justice For Dada) या मोहिमेद्वारे रणशिंग फुंकले आहे. आमदार मिटकरी यांनी एका ‘लाईव्ह’ संवादातून आपल्या मनातील सल बोलून दाखवली. ते म्हणाले, “अधिवेशनाच्या काळात शंभुराज देसाई यांच्या साताऱ्याच्या प्रकरणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ४० आमदार एकत्र आले. मात्र, मी जेव्हा अजितदादांच्या अपघाताच्या तपासासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला बसलो, तेव्हा विनंती करूनही कुणीही आले नाही. जर त्यावेळी सर्व आमदार एकवटले असते, तर आज तपासाचे चित्र वेगळे असते. दुर्दैवाने आम्ही ती वेळ गमावली.” ब्लॅक बॉक्स आणि सीसीटीव्ही फुटेजवरून संशय अमोल मिटकरी यांनी तपासातील तांत्रिक बाबींवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी १५ दिवसांत ब्लॅक बॉक्सचा डेटा जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते, मग अडीच महिने झाले तरी तो डेटा समोर का आला नाही? विमानतळावरील गेट नंबर ८ पासून विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज का लपवले जात आहेत? विमानात ५ प्रवासी होते की ६, हे सरकारने स्पष्ट करावे,” अशी मागणी त्यांनी केली. DGCA च्या अहवालातील विसंगतीवर बोट नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) भूमिकेवरही अमोल मिटकरींनी संशय व्यक्त केला. प्राथमिक अहवालात अपघातस्थळी झाड असल्याचे दाखवण्यात आले आहे, मात्र प्रत्यक्षात तिथे कोणतेही झाड नव्हते, असा दावा त्यांनी केला. तसेच, पायलट कोण होता आणि विमानात नेमके किती लोक होते, याचा उलगडा अद्याप का झाला नाही? असा सवाल करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलनाची घोषणा या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी अमोल मिटकरी आता जनतेचे न्यायालय गाठणार आहेत. त्यासाठी त्यांनी राज्यभर ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलनाची घोषणा केली आहे. आगामी काळात जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर यात्रा काढली जाईल. प्रत्येक ग्रामसभेत या प्रकरणाच्या चौकशीचा ठराव मंजूर करून तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. अजितदादांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा निर्धार अमोल मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर अजित पवारांचा फोटो घेऊन एकटेच बसले दरम्यान, अजित पवारांचे गत 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. अमोल मिटकरी तेव्हापासून या अपघातावर संशय व्यक्त करत आहेत. त्यांनी या प्रकरणी सभागृहातही चर्चा करण्याची मागणी केली होती. यादरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात अमोल मिटकरी थेट विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकटेच अजित पवारांचा फोटो घेऊन बसले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातील आमदार देखील नव्हते.
