आश्वासनानंतरही वीज नाही; महावितरण कार्यालयासमोर केली सत्यनारायण पूजा:शिदवाडी- खंबाळे वस्तीवरील संतप्त रहिवाशांचे अनाेखे आंदाेलन
![]()
इगतुपरी तालुक्यातील शिदवाडी व खंबाळे परिसरातील आदिवासी वस्तीला वीजपुरवठा देण्याचे लेखी आश्वासन महावितरणकडून देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने एल्गार कष्टकरी संघटनेने येथील एमएसईबी कार्यालयासमोर सत्यनारायणाची पूजा करत अनोखे आंदोलन
.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या आंदोलनानंतर पत्राद्वारे संबंधित वस्तीतील रहिवाशांना वीजपुरवठा देण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे कळवले होते. नवीन ग्राहकांकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारून तांत्रिक अंदाजपत्रक तयार करून पुढील मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. या वस्तीमध्ये सुमारे ३०० ते ४०० रहिवासी वास्तव्यास असून तातडीने वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. मंजुरीनंतर डीपीडीसी किंवा अन्य योजनांमधून निधी उपलब्ध करून काम हाती घेतले जाईल, असेही आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
आदिवासी पाड्यांवर तातडीने वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने कार्यालयात सत्यनारायणाची पूजा घालून प्रशासनाला सद्बुद्धी देण्याची मागणी करण्यात आली. शासनाच्या भूमिकेचा निषेधही यावेळी व्यक्त करण्यात आला. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तानाजी कुंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काळू निरगुडे, गणपत गावंडे, मथुरा भगत, मंगल खडके, शांताराम पादीर, राजू भगत, वसंत इरते आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. लवकर वीजपुरवठा न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
खंबाळे ग्रामपंचायतीमधील डहाळेवाडी येथे निधी नसल्यामुळे कामे करता येत नाही. मात्र, तरी ११ मार्च २०२५ रोजी याबाबतचा प्रस्ताव आम्ही महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयात दिला आहे. : पी. बी. सरोदे , सहायक अभियंता, महावितरण
