५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त; बोलेरो पिकअपसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – गोवंश जनावरांची अवैध वाहतूक आणि कत्तलीसाठी होणारी तस्करी रोखण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मुखेड पोलिसांनी आखरगा ते लोकातांडा जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून कत्तलीसाठी अवैधरीत्या वाहतूक करण्यात येणाऱ्या सात गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह एकूण ५ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मुखेड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की, आखरगा ते लोकातांडा जाणाऱ्या रस्त्यावर एका महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनातून गोवंश जनावरांची कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. संशयित बोलेरो पिकअप (क्रमांक एमएच २६ बीई ५५१०) अडवून पंचांसमक्ष तपासणी केली असता वाहनामध्ये सात गोवंश जनावरे अत्यंत निर्दयीपणे दोरीने बांधून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ सातही जनावरांची सुटका करून वाहनासह मुद्देमाल जप्त केला. यामध्ये बोलेरो पिकअप वाहनाची किंमत ४ लाख ५० हजार रुपये, तर सात गोवंश जनावरांची किंमत ८८ हजार रुपये, असा एकूण ५ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी १) बिबीशन बालाजी पवार (वय २५, रा. तांदळी), २) बिलाल अशीफसाब कुरेशी (वय २५, रा. माखणी, ता. मुखेड) आणि ३) गणेश देवकते (रा. तारदरवाडी, ता. मुखेड) यांच्याविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७४/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमातील कलम ५(ब), ९ तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देण्यास प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कामठेवाड, पोलीस उपनिरीक्षक माने आणि पोलीस अंमलदार भारत फंताडे व मुखेड पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. नागरिकांना पोलिसांचे आवाहन गोवंश जनावरांची अवैध वाहतूक, जनावरांवर अत्याचार किंवा कत्तलीसाठी संशयास्पद पद्धतीने वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा डायल ११२ वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन नांदेड पोलिसांकडून करण्यात आले आहे. Post Views: 70 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 8 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation नांदेड जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; दोन तास कसून तपासणी; संशयास्पद वस्तू आढळली नाही, दुपारी ४.२५ वाजता न्यायालयाचे कामकाज पूर्ववत शेतकरी चंद्रकांत शिंदे मृत्यू प्रकरणाचा तपास सुरूच; दोघांची कोठडी ४ नोव्हेंबरपर्यंत वाढवली