‘लिंकवर क्लिक करा’ या जुन्या आमिषाला आता नागरिक बळी पडत नसल्याने सायबर गुन्हेगारांनी आपली कार्यपद्धती पूर्णपणे बदलली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे बनवलेले डीपफेक व्हिडिओ आणि 100 टक्के आयपीओ लागण्याच्या दाव्यांना भुलून शहरातील डॉक्टर, इंजिनिअर्स आणि उच्चशिक्षित व्यावसायिक कोट्यवधी रुपये गमावत असल्याचा गंभीर प्रकार पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे. फसवणुकीचा हा पैसा अवघ्या काही मिनिटांत ‘क्रिप्टोकरन्सी’च्या माध्यमातून परदेशात वळवला जात असल्याने या गुन्ह्यांची उकल करणे आणि पैसे परत आणणे तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान बनले आहे. सायबर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगारांनी आता तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रगत आणि धोकादायक वापर सुरू केला आहे. प्रख्यात उद्योगपती आणि सेलिब्रिटींचे एआयद्वारे हुबेहूब दिसणारे, बोलणारे बनावट व्हिडिओ (डीपफेक) तयार केले जात आहेत. विशिष्ट ॲपमध्ये गुंतवणूक केल्यास हमखास नफा मिळेल, असा दावा या व्हिडिओंमधून केला जातो. पैशांचा मागोवा घेणे का ठरतेय कठीण? या नव्या सायबर गुन्हेगारीचे मूळ फसवणुकीच्या पैशांच्या प्रवासात दडले आहे. गुंतवणूकदाराने बनावट ॲपवर भरलेला पैसा आधी देशातील स्थानिक भाड्याच्या बँक खात्यांमध्ये जातो. तेथून काही मिनिटांतच त्याचे ‘पियर-टू-पियर’ नेटवर्कद्वारे क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर केले जाते. तो पैसा आंतरराष्ट्रीय वॉलेट्समध्ये वळवला जातो. आंतरराष्ट्रीय कायद्यांमधील पळवाटा यामुळे एकदा क्रिप्टोमध्ये गेलेला पैसा परत मिळवणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत जिकिरीचे ठरते. फसवणूक टाळण्यासाठी काय करावे? स्क्रीन शेअर करू नका : ट्रेडिंग शिकण्याच्या नादात कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत मोबाइल स्क्रीन शेअर करू नका. नोंदणी तपासा : कंपनीची ‘सेबी’कडे नोंदणी तपासा. सोशल मीडियावरील अनोळखी प्रोफाइल किंवा गुंतवणुकीच्या दाव्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. व्यवहार थांबवा : ॲप नामांकित असले तरी पैसे भरताना यूपीआय आयडी एखाद्या वैयक्तिक नावावर असेल तर व्यवहार थांबवा. टप्प्याटप्प्याने 17 लाख उकळले शेंद्रा एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीत प्रॉडक्शन ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या एका 40 वर्षीय अधिकाऱ्याला फेसबुकवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा एक व्हिडिओ दिसला. या डीपफेक व्हिडिओमध्ये गरीब लोकांना फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा मिळवण्याचे आवाहन करण्यात आले होते. हा व्हिडिओ खरा वाटल्याने अधिकाऱ्याने दिलेल्या लिंकवर नोंदणी केली. त्यानंतर परदेशी चलनाच्या व्यापारात 32 हजार डॉलर्सचा खोटा, आभासी नफा दाखवून सायबर गुन्हेगारांनी या अधिकाऱ्याकडून टप्प्याटप्प्याने 17 लाख 34 हजार रुपये उकळले. यासाठी या अधिकाऱ्याला घरातील सोन्याचे दागिनेही विकावे लागले. बनावट ॲपवरील नफा आणि डाटा गायब झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. गुंतवणुकीच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका सायबर गुन्हेगारांनी आता एआय आणि डीपफेकचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील अनोळखी प्रोफाइलवर किंवा गुंतवणुकीच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका. कंपनीची ‘सेबी’कडे नोंदणी तपासा. ट्रेडिंग शिकण्याच्या नादात कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत मोबाइल स्क्रीन शेअर करू नका. – प्रसाद मुळे, सायबर सुरक्षा तज्ज्ञ What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 11 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation विद्यार्थी आणि प्राध्यापकांनीही घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ नागपूरच्या वर्धमाननगरातील स्टीलच्या गोदामाला भीषण आग:अग्निशमन दलाच्या 7-8 गाड्या घटनास्थळी दाखल, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट