देशातील लोकशाही व्यवस्था आणि संस्थांचे रक्षण करण्यासह अराजकतेला विरोध करण्याच्या उद्देशाने ‘मी भारत प्रेमी’च्या वतीने पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानाचा सन्मान, देशाची एकता आणि अखंडता टिकविण्याचा संदेश देत या मोर्चात सायंकाळी ६ च्या दरम्यान मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथून मोर्चाला सुरुवात झाली. तर डेक्कन जिमखाना येथे समारोप करण्यात आला. ‘भारतीय संविधान, मी भारत प्रेमी, माझा देश, माझी जबाबदारी’ हा संदेश घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चातून लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. नागरिकांना आपले प्रश्न आणि समस्या शांततापूर्ण मार्गाने मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, या अधिकाराचा वापर करताना लोकशाही व्यवस्था आणि घटनात्मक संस्थांवर आरोप करून अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न होऊ नयेत, अशी भूमिका मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आली. नागरिकांचे हित, देशाची एकता आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणे आणि देशाच्या एकता व अखंडतेच्या रक्षणासाठी नागरिकांनी जबाबदारीने पुढाकार घेणे, हा मोर्चाचा मुख्य उद्देश होता. मोर्चामध्ये सहभागी नागरिकांनी देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत विविध घोषणा दिल्या. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शांततापूर्ण मार्गाने देशहिताची भूमिका मांडत नागरिकांनी मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search