शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज (31 ऑक्टोबर) सायंकाळी दादर येथील शिवसेना भवनासमोरील ब्राह्मण सहाय्यक संघ येथे पार पडत आहे. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ज्येष्ठ पत्रकार अमरीश मिश्र यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या लेखनशैलीचे, पुस्तकातील आशयाचे आणि त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाचे कौतुक केले. तसेच संजय राऊत यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. राज ठाकरे म्हणाले की, अमरीश मिश्र यांचे भाषण सुरू असताना त्यांच्या हातातील कागदांच्या गठ्ठ्याकडे मेहता पब्लिकेशनचे मेहता ज्या नजरेने पाहत होते, त्यावरून आणखी एक चांगले पुस्तक तयार होऊ शकते, असे वाटले. अमरीश मिश्रा यांनी मांडलेले विषय आणि त्यांची भाषाशैली उत्तम असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठी भाषा कशी बोलावी आणि कशी लिहावी, याबाबत समाजात प्रबोधन होण्याची गरज असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ‘सरकारी कार्यालये आणि न्यायालयांमध्ये चांगले मराठी लिहिण्यासाठी क्लासेस घ्यावेत’ मराठी भाषेच्या वापरावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी सरकारी कार्यालये आणि न्यायालयांमधील मराठी भाषेच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, सरकारी कार्यालये आणि न्यायालयांमध्ये वापरली जाणारी मराठी अनेकदा इतकी अवघड आणि चुकीच्या पद्धतीने लिहिलेली असते की, त्याचा नेमका अर्थही समजत नाही. मला अनेकदा न्यायालयाच्या नोटिसा आल्या आहेत. त्या वाचल्यानंतर आपल्याला नेमके अडकवले आहे की सोडले आहे, हेच समजत नाही, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. अमरीश मिश्रा यांनी सरकारी खात्यांमध्ये आणि न्यायालयांमध्ये चांगले मराठी लिहिण्यासाठी विशेष वर्ग सुरू करावेत, असेही ते म्हणाले. उत्तम मराठी शिकण्यासाठी चांगली पुस्तके वाचणे आवश्यक आहे. संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकातूनही मराठी भाषेचा आणि लेखनाचा एक चांगला नमुना वाचकांसमोर येत असल्याचे त्यांनी नमूद केले. वडिलांकडे संजय राऊत तासनतास गप्पा मारायला यायचे संजय राऊत यांच्यासोबतच्या जुन्या संबंधांची आठवण सांगताना राज ठाकरे म्हणाले, संजय राऊत आणि दिलीप ठाकूर हे दोघेही माझ्या वडिलांकडे म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तासनतास बसायला यायचे. त्या काळात ते ‘मार्मिक’साठी लेखन करत असत. त्यामुळे संजय राऊत यांच्याशी माझा पहिला संबंध वडिलांमुळे आला आणि पुढे बाळासाहेबांशी त्यांची जवळीक वाढत गेली. 1986-87 च्या काळात राज ठाकरे ‘मार्मिक’मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते, तर संजय राऊत ‘लोकप्रभा’मध्ये कार्यरत होते. त्या काळात इंडियन एक्स्प्रेसच्या कॅन्टीनमध्ये दोघांच्या गप्पा रंगायच्या. संजय राऊत हे त्यांच्या गँगवॉरवरील लेखांसाठी प्रसिद्ध होते. मुंबईतील गँगवॉरच्या घटनांवर ते अत्यंत प्रभावीपणे लिहायचे. त्यांच्या त्या लेखनाचे आपणही वाचन करत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. बाळासाहेबांनी संजय राऊत यांना मुलाखतीत शिव्या दिल्या; तरीही संपूर्ण मुलाखत प्रसिद्ध केली संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील एका जुन्या प्रसंगाचाही राज ठाकरे यांनी उल्लेख केला. त्यावेळी संजय राऊत ‘लोकप्रभा’मध्ये काम करत होते. त्यांच्या लेखनात शिवसेनेवरही टीका असायची. त्यामुळे बाळासाहेबांना संजय राऊत यांचे लेखन फारसे आवडत नव्हते. मात्र, एकदा राज ठाकरे यांनी बाळासाहेबांकडे संजय राऊत यांना मुलाखत देण्याची विनंती केली. राज ठाकरे म्हणाले, सुरुवातीला बाळासाहेबांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र, आपण आग्रह केल्यानंतर त्यांनी मुलाखत देण्यास होकार दिला. त्यानंतर शिवसेना भवनात संजय राऊत यांनी बाळासाहेबांची मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान बाळासाहेबांनी संजय राऊत यांना अनेकदा शिव्या दिल्या. विशेष म्हणजे, ती मुलाखत रेकॉर्ड झाली होती आणि प्रसिद्ध करताना संजय राऊत यांनी बाळासाहेबांनी दिलेल्या शिव्यांसह संपूर्ण मुलाखत प्रसिद्ध केली. ही गोष्ट बाळासाहेबांना आवडली. राज ठाकरे म्हणाले, स्वतःवर झालेली टीका किंवा स्वतःला दिलेल्या शिव्याही प्रामाणिकपणे लोकांसमोर मांडण्याचे धाडस संजय राऊत यांनी दाखवले. त्यावेळी बाळासाहेबांच्या मनात ‘बंदे में दम है’ अशी भावना निर्माण झाली होती. स्वतःवर विनोद करू शकणारा आणि स्वतःबद्दलच्या अशा गोष्टीही लपवून न ठेवणारा माणूस प्रामाणिक असतो, असेही त्यांनी सांगितले. ‘सामनाचे संपादक व्हावेत’, अशी चर्चा बाळासाहेबांशी केली यानंतर संजय राऊत यांना ‘सामना’चे संपादक करण्याबाबत चर्चा सुरू झाली. पुढे बाळासाहेबांनी संजय राऊत यांना बोलावून उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घडवून देण्यास सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाली आणि पुढे संजय राऊत ‘सामना’चे संपादक झाले. वडिलांकडे येण्यापासून ते ‘सामना’चे संपादक होण्यापर्यंतचा संजय राऊत यांचा संपूर्ण प्रवास आपण जवळून पाहिला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. ‘बोधनकरांपासून सुरू झालेला प्रवास बोध कीर्तनापर्यंत येईल, असे वाटले नव्हते’ संजय राऊत यांच्या पत्रकारितेतील प्रवासाचा उल्लेख करताना राज ठाकरे यांनी जयप्रकाश बोधनकर यांचेही नाव घेतले. गँगवॉरच्या बातम्यांपासून सुरू झालेला संजय राऊत यांचा प्रवास आता ‘बोध कीर्तन’ या पुस्तकापर्यंत पोहोचला आहे. बोधनकरांपासून सुरू झालेला हा प्रवास बोध कीर्तनापर्यंत येईल, असे आपल्याला वाटले नव्हते, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. पुस्तकातील आशयाबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, या पुस्तकात अनेक छोट्या छोट्या गोष्टी, संदर्भ आणि विचार मांडण्यात आले आहेत. पुस्तक वाचताना त्यांना ज्येष्ठ पत्रकार निळकंठ खाडिलकर यांच्या छोट्या पुस्तकांची आठवण झाली. त्या पुस्तकांमध्ये चार ते आठ वाक्यांतून महत्त्वाचे विचार मांडले जात असत. त्याच प्रकारे संजय राऊत यांनीही या पुस्तकातून अनेक विषय वाचकांसमोर आणले आहेत. निजार कब्बानी यांच्या कवितेचा उल्लेख; 2014 च्या प्रचाराची आठवण राज ठाकरे यांनी पुस्तकातील निजार कब्बानी यांच्या प्रेमकवितेचा संदर्भही दिला. या कवितेतील ओळी वाचताना आपल्याला 2014 मधील नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची आठवण झाल्याचे त्यांनी मिश्किलपणे सांगितले. या कवितेत प्रिय व्यक्तीला इतर प्रेमिकांपेक्षा काहीतरी वेगळे देण्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. दुसरा एखादा कंदील देत असेल, तर मी तुला चंद्र देईन; तो ढग देईल, तर मी मुसळधार पाऊस देईन; तो फांदी देईल, तर मी बहरलेले झाड देईन, अशा आशयाच्या ओळींचा त्यांनी उल्लेख केला. ‘मी जरा वेगळाच आहे, प्रिये, मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे,’ या कवितेतील भावनेतून 2014 च्या प्रचाराची आठवण झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. जेलमध्ये असतानाच्या अनुभवांवर पुस्तक; पुढेही लेखन सुरू ठेवण्याची अपेक्षा ‘बोध कीर्तन’ या पुस्तकात संजय राऊत यांनी तुरुंगात असताना आलेले अनुभव, मनात निर्माण झालेले विचार आणि त्या काळात जाणवलेल्या विविध गोष्टी मांडल्या आहेत. अशा प्रकारचे पुस्तक तुरुंगात असतानाच निर्माण होऊ शकते, असे राज ठाकरे म्हणाले. संजय राऊत यांनी यापुढेही अशीच चांगली पुस्तके लिहावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, ही पुस्तके तुरुंगात राहून नव्हे, तर बाहेर राहून लिहावीत, अशी मिश्किल टिप्पणी करत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. संजय राऊत यांचे ‘बोध कीर्तन’ हे पुस्तक सर्वांनी विकत घेऊन वाचावे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले. अखेर संजय राऊत यांच्या लेखनाचे कौतुक करत त्यांच्याकडून भविष्यात आणखी चांगल्या पुस्तकांची अपेक्षा असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. ‘हे उत्तम पुस्तक संजयने लिहिले आहे. आपणा सर्वांना ते नक्की आवडेल,’ असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. जय हिंद, जय महाराष्ट्र, असे म्हणत राज ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हेही वाचा…. बीडच्या ऊसतोड मजुरांसाठी 29 ऑक्टोबर ठरला काळा दिवस:24 तासांत तीन मजुरांचा अपघाती मृत्यू, दुष्काळाने गाव सोडलं अन् अपघाताने जीव घेतला दुष्काळ, नापिकी आणि गावात रोजगाराच्या संधींचा अभाव यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी घरदार सोडून ऊसतोडणीच्या कामासाठी बाहेर पडलेल्या बीड जिल्ह्यातील तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 29 ऑक्टोबर रोजी वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या तीन अपघातांमध्ये या मजुरांना आपला जीव गमवावा लागला. कर्नाटक, कोल्हापूर आणि कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर घडलेल्या या घटनांमुळे ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही दुर्घटनांमध्ये बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांतील मजुरांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सविस्तर वाचा…. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 17 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation नालासोपाऱ्यात सात मजली इमारतीची लिफ्ट थेट तळमजल्यावर कोसळली:8 जण गंभीर जखमी, रहिवाशांनी दरवाजा तोडून बाहेर काढले लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘मी भारत प्रेमी’चा पायी मोर्चा:पुण्यात नागरिक सहभागी; संविधानाचा सन्मान आणि देशाची एकता-अखंडता जपण्याचा संदेश