नालासोपारा पश्चिमेकडील एका सात मजली इमारतीत लिफ्ट कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी (31 ऑक्टोबर) दुपारी घडली. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून आठ जणांना घेऊन खाली येत असलेली लिफ्ट अचानक वेगाने थेट तळमजल्यावर आदळली. या अपघातात लिफ्टमधील आठही जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर इमारतीत एकच गोंधळ उडाला. लिफ्टमध्ये प्रवासी अडकल्याने रहिवाशांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. अखेर लिफ्टचा दरवाजा तोडून जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाचव्या मजल्यावरून खाली येताना अचानक लिफ्ट कोसळली मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिमेतील पाटणकर पार्क परिसरात धनंजय ॲव्हेन्यू नावाची सात मजली इमारत आहे. शनिवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास आठ जण या इमारतीतील लिफ्टमधून पाचव्या मजल्यावरून तळमजल्याच्या दिशेने येत होते. लिफ्ट खाली येत असतानाच अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि लिफ्ट वेगाने खाली कोसळली. काही क्षणांतच लिफ्ट थेट तळमजल्यावर आदळली. या धक्क्यामुळे लिफ्टमध्ये असलेल्या आठही प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. मोठा आवाज होताच रहिवाशांची घटनास्थळी धाव लिफ्ट तळमजल्यावर आदळल्यानंतर झालेला मोठा आवाज ऐकून इमारतीतील रहिवासी घाबरले. काय घडले हे पाहण्यासाठी अनेकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लिफ्टमध्ये आठ जण अडकल्याचे समोर आल्यानंतर रहिवाशांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, अपघातामुळे लिफ्टचा दरवाजा उघडत नव्हता. त्यामुळे आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात अडचणी निर्माण झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रहिवाशांनी एकत्र येत लिफ्टचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रयत्नांनंतर दरवाजा उघडण्यात यश आले. त्यानंतर आत अडकलेल्या आठही जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. लिफ्टमध्ये स्प्रिंग यंत्रणा असतानाही अपघात या घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी इमारतीची पाहणी करून अपघाताची माहिती घेतली. प्राथमिक माहितीनुसार, धनंजय ॲव्हेन्यू ही इमारत जुन्या वास्तूचे नूतनीकरण करून उभारण्यात आली आहे. त्यामुळे इमारतीतील लिफ्टची सुरक्षा आणि देखभाल याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, सोसायटीचे अध्यक्ष समीर धोंडे यांनी लिफ्टमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने स्प्रिंग यंत्रणा बसवण्यात आल्याचे सांगितले. मात्र, ही सुरक्षा यंत्रणा उपलब्ध असतानाही लिफ्ट थेट तळमजल्यावर कोसळल्याने नेमका बिघाड कशामुळे झाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लिफ्टच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर या अपघातामुळे इमारतींमधील लिफ्टच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेषतः जुन्या इमारतींमधील लिफ्टची नियमित तपासणी, तांत्रिक देखभाल आणि आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहेत की नाही, याकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. लिफ्टमध्ये आठ जण असताना ती अचानक खाली कोसळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लिफ्ट नेमकी कोणत्या तांत्रिक कारणामुळे कोसळली, तिच्या देखभालीत काही त्रुटी होत्या का आणि सुरक्षेसाठी बसवलेली स्प्रिंग यंत्रणा अपघातावेळी कार्यरत होती का, याचा तपास होणे आवश्यक आहे. पोलिसांच्या पाहणीनंतर या दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. हेही वाचा…. बहुचर्चित केतन अग्रवाल खटल्याची न्यायालयात पहिली सुनावणी पार पडली:तिसऱ्या आरोपीला वकील नेमण्याचे निर्देश, 17 नोव्हेंबरला पुढील सुनावणी बहुचर्चित केतन अग्रवाल खटल्याच्या सुनावणीला अखेर सुरुवात झाली आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात उपस्थित राहून खटल्याची सुनावणी सुरू करण्याची विनंती केली. तसेच तीन आरोपींविरोधात सरकार पक्षाकडे कोणते पुरावे आहेत आणि कोणत्या कागदपत्रांच्या आधारे खटला चालवला जाणार आहे, याची सविस्तर जंत्री न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयानेही आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सविस्तर वाचा…

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search