उमराफाटा ते बोल्डा फाटा मार्गावर जांभरून शिवारात दोन दुचाकीच्या धडकेत दोन जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी ता. ३० दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कळमनुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी उशीरा मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील तलाबकट्टा भागातील रहिवासी अब्दुल मजीद बागवान (६५) यांचे जांभरून शिवारात शेत आहे. आज दुपारच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकी वाहनावर जांभरून येथे शेताकडे जात होते. उमराफाटा ते बोल्डाफाटा मार्गावर जांभरून शिवारात बोल्डाफाटा येथून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीची त्यांच्या दुचाकीसोबत धडक झाली. या अपघातात दुचाकी वाहनावरील अब्दूल मजीद बागवान व दुसऱ्या दुचाकीवरील राजेश साखरे (३८, रा. वाकोडी, ता. कळमनुरी) दोघेही रस्त्यावर पडले. दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कळमनुरी पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच कळमनुरीचे उपाधिक्षक मयुर रसाळ, उपनिरीक्षक तुरनर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस. पी. सांगळे, जमादार शेख रहीम, दिलीप पोले, गजानन होळकर, लक्ष्मीकांत माखने यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांनाही रुग्णवाहिकेद्वारे कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा मृ्त्यू झाल्याचे जाहिर केले. दरम्यान, मयत राजेश हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होते. आज बोल्डा येथील आठवडी बाजार असल्याने तो भाजीपाला विक्रीसाठी बाजारात गेला होता. दुपारी तो कळमनुरीकडे येत असतांना हा अपघात झाला. मयत राजेश याच्या पश्‍चात वडिल, पत्नी,दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. तर मयत अब्दूल माजीद यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत कळमनुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed

Home
Account
Cart
Search