जळगाव आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकांमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जळगावमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपने मिळून तीन जागा बिनविरोध जिंकल्या आहेत, तर सोलापूर जिल्हा बँकेतही भाजपने बार्शी, मोहोळ आणि मंगळवेढा या तीन तालुक्यांत बिनविरोध विजय मिळवत आपले खाते उघडले आहे. दुसरीकडे, सोलापुरात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्यासह शरद पवार गटाच्या नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, उर्वरित जागांवर मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली असून, महायुतीने तीन जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या दोन, तर भाजपच्या एका जागेचा समावेश आहे. पारोळा, एरंडोल आणि भुसावळ विकास सोसायट्यांच्या मतदारसंघातून इतर कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे या तिन्ही जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. पारोळा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या नलिनी चिमणराव पाटील (आमदार अमोल पाटील यांच्या मातोश्री). एरंडोल मतदारसंघात मृणाल अमोल पाटील (आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी). तर भुसावळ मतदारसंघात रजनी संजय सावकारे (मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी). यांची बिनविरोध निवड झाली आहे. महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नसतानाच या तीन जागा बिनविरोध झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जागावाटपाबाबत वाटाघाटी सुरू असतानाच, शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी चर्चा करून आपल्या कुटुंबातील दोन जागा बिनविरोध करून घेतल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपची मुसंडी तर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत आपले खाते उघडले आहे. विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातील एकूण 11 जागांपैकी बार्शी, मोहोळ आणि मंगळवेढा या तीन महत्त्वाच्या तालुक्यांतील जागा बिनविरोध झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या तिन्ही मतदारसंघांमध्ये केवळ एकाच कुटुंबातील सदस्यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असून, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी याची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. बार्शी तालुक्यातून भाजप आमदार राजेंद्र राऊत हे बिनविरोध होणार असून, त्यांचे पुत्र रणवीर राऊत यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाणार आहे. मोहोळ तालुक्यातून भाजप नेते विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांची निवड निश्चित झाली असून, त्यांचे वडील आणि माजी आमदार राजन पाटील आपला अर्ज मागे घेणार आहेत. तसेच, मंगळवेढा तालुक्यातून सिद्धेश्वर अवताडे यांचाही मार्ग मोकळा झाला असून, बबनराव अवताडे यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे अर्ज मागे घेतले जाणार आहेत. मोहिते पाटील बंधू रिंगणात; बिनविरोधसाठी प्रयत्न दुसरीकडे, शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनीदेखील या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील जाणकार आणि ज्येष्ठ नेत्यांशी या संदर्भात सध्या चर्चा सुरू असून, लवकरच उर्वरित जागांबाबतही बिनविरोध निवडणुकीचा निर्णय होईल, असा विश्वास खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे. आमदार उत्तम जानकरांचे शक्तिप्रदर्शन तर माळशिरसमध्ये शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांच्या समर्थकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. माळशिरस तालुक्यातून त्यांच्या पॅनेलकडून एकूण चार अर्ज भरण्यात आले आहेत. या जिल्हा बँकेच्या माध्यमातून केवळ शेतीलाच नव्हे, तर शेतीपूरक व्यवसायांनाही अत्यंत सुलभ पद्धतीने कर्जवाटप झाले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका आमदार उत्तम जानकर यांनी यावेळी मांडली. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 24 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation पोटच्या मुलाचा गळा आवळून खून केला:पित्याला जन्मठेप; मृत्यूनंतर मुलाचे हाल होतील, या विचाराने 12 वर्षीय मुलाची हत्या