राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आज वाशिम जिल्ह्यात आक्रमक पवित्रा घेतला. वाशिममधील शेलू बाजार परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी भव्य रास्तारोको आंदोलन केले. यावेळी महामार्गावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आमदार नितीन देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ‘हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या’ राज्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, त्यांना मिळणारी मदत अतिशय तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांची मदत वाढवून त्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यासाठी हजारो दुष्काळग्रस्त शेतकरी, ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. समृद्धी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज समृद्धी महामार्ग रोखण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला होता. यासाठी शेलू बाजार परिसरात मोठी गर्दी जमली होती. अकोला-आर्णी मार्गाच्या खाली आंदोलक जमा झाले होते आणि तेथून समृद्धी महामार्गावर चढण्यासाठी शेतकरी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि तणाव या मार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्याच्या सीमेवरच आंदोलकांची वाहने अडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. अकोला-आर्णी मार्गाखाली पोलिसांनी बॅरिकेड्स लावून आंदोलनकर्त्यांना महामार्गावर जाण्यापासून रोखल्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. आमदार नितीन देशमुखांसह कार्यकर्ते ताब्यात वाढता तणाव आणि महामार्ग रोखण्याचा आक्रमक प्रयत्न पाहता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार नितीन देशमुख यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. सध्या या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण शांतता आहे. या आक्रमक आंदोलनामुळे ठाकरे गटाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला थेट कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. —————– हेही वाचा.. राज्याचे नेतृत्व बदलून एकनाथ शिंदेंकडे द्या: शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांची मागणी; म्हणाले- भविष्यात शिंदे-ठाकरे एकत्र येऊ शकतात

विधान परिषद निवडणुकीतील महायुतीच्या कामगिरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या निकालाला राज्याच्या नेतृत्वाचा पराभव असल्याचे सांगत, राज्याचे नेतृत्व बदलून ते पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले पाहिजे, या आपल्या मागणीचा शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी पुनरुच्चार केला आहे. यासोबतच, शिवसेनेवर युतीधर्म न पाळल्याचा आरोप करणारे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावरही त्यांनी ‘ते पगारी माणूस आहेत, त्यांचे काय ऐकता?’ अशी टीका केली आहे. सविस्तर वाचा

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed

Home
Account
Cart
Search