शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने दोन ज्येष्ठांची फसवणूक:पुणे येथे सायबर चोरट्यांकडून 60 लाखांची आर्थिक लुबाडणूक
![]()
शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोन ज्येष्ठ नागरिकांना ६० लाख रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर आणि अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत, कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर राहणाऱ्या ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ५४ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाली. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत संदेश पाठवला. त्यानंतर संपर्क साधून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवले. ज्येष्ठ नागरिकांनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले, मात्र त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसऱ्या एका प्रकरणात, कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी सहा लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. या संदर्भात ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक कदम या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुणे शहरात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. नुकताच मगरपट्टा सिटी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची १२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सायबर चोरटे अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत आहेत. दरम्यान, सायबर चोरट्यांनी एका तरुणाचा मोबाईल क्रमांक ‘हॅक’ करून त्याच्या बँक खात्यातून चार लाख ३९ हजार रुपये काढून घेतल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. या तरुणाने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला होता. चोरट्यांनी मोबाईलचा तांत्रिक ताबा घेऊन खात्यातून रक्कम दुसऱ्या खात्यात वळवली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते या प्रकरणाचा तपास करत आहेत.
