शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्याकांडाला आज तब्बल 1 महिना पूर्ण झाला असतानाच ठाण्यातील राजकीय वातावरण अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचले आहे. या हत्याकांडाच्या कटामागे शिवसेनेच्या (शिंदे गट) ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा हात असल्याचा थेट आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. या गंभीर घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिनाक्षी शिंदे यांच्या पदाबाबत अत्यंत सूचक आणि खळबळजनक विधान केले आहे. “एखाद्या नेत्यावर गंभीर आरोप होत असतील, तर आरोप खोटे सिद्ध होईपर्यंत त्यांनी स्वतःहून पक्षाचे पद बाजूला ठेवणे योग्य ठरेल; हीच माझी प्रांजळ भूमिका असून मी ती एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर घातली आहे,” असे सांगत सरनाईक यांनी मिनाक्षी शिंदे यांना पदावरून पायउतार होण्याचा अप्रत्यक्ष संदेश दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दुसरीकडे, 1 महिना उलटूनही मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई न झाल्याने ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाला असून, पोलिसांनी सर्वपक्षीय मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर आता ठाण्यात उबाठा विरुद्ध शिंदे सेना असा थेट राजकीय संघर्ष उफाळला आहे. माझ्यावर आरोप झाले तर मी तत्काळ बाजूला होईन; सरनाईकांचा मिनाक्षी शिंदेंना थेट इशारा ठाण्यात खासदार नरेश म्हस्के यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मिनाक्षी शिंदे यांच्यावरील आरोपांविषयी विचारले असता मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “जर उद्या माझ्यावर अशा एखाद्या प्रकरणात आरोप झाले, तर प्रताप सरनाईक यांनी तत्काळ पक्षप्रमुखांना सांगायला हवे की, ‘साहेब, जोपर्यंत माझ्यावरील आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत मी पदापासून बाजूला राहतो.’ मला विचाराल तर ही माझी प्रामाणिक आणि प्रांजळ भूमिका आहे.” मुख्यमंत्री शिंदेंनाही कळवली भूमिका “आपल्या पक्षाच्या नेत्यावर एवढे गंभीर आरोप होत असतील, तर त्यांनी पक्षाचे जे काही पद आहे ते बाजूला काढून ठेवणे अतिशय योग्य ठरेल. ही माझी व्यक्तिगत भूमिका असून मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनाही याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे.” महिला जिल्हासंघटक पदावर गंडांतर? ठाण्याच्या राजकारणात मिनाक्षी शिंदे यांचा मोठा दबदबा आहे. मात्र, सरनाईक यांच्या या जाहीर विधानामुळे शिंदे सेनेचे पक्षनेतृत्व मिनाक्षी शिंदे यांच्याकडून ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा घेणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाला 1 महिना पूर्ण 29 सप्टेंबर रोजी रात्री प्रदीप पूर्णेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर गेल्या 30 दिवसांत ठाण्यात प्रचंड असंतोष पाहायला मिळाला. गेल्या 2 दिवसांत पूर्णेकर समर्थकांनी नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला होता, तर घोडबंदर रोडवर तब्बल 6 ते 7 तास रास्ता रोको करत वाहनांचे टायर जाळण्यात आले होते. पूर्णेकर यांच्या पत्नीने गृहखाते आणि पोलिसांच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. आज रात्री 8 वाजता कँडल मार्च सर्वपक्षीय मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने तो ऐनवेळी रद्द करण्यात आला असला, तरी पूर्णेकर कुटुंबीय आणि समर्थक आज रात्री 8 वाजता शांततेच्या मार्गाने कँडल मार्च काढून प्रदीप पूर्णेकर यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. आदित्य ठाकरे ठाण्यात, तर शिंदे सेनेचे ‘आनंद आश्रमा’त शक्तिप्रदर्शन हत्याकांडाच्या एका महिन्याच्या पार्श्वभूमीवर आज ठाण्यात दोन्ही प्रतिस्पर्धी गट आमनेसामने आले आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि राजन विचारे हे आज थेट पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत. त्यानंतर ते ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन मुख्य सूत्रधारांना तात्काळ बेड्या ठोकण्याची मागणी करणार असून पत्रकार परिषद घेणार आहेत. ठाकरे गटाच्या आक्रमकतेला शह देण्यासाठी शिंदे सेनेनेही ठाण्यातील मध्यवर्ती ‘आनंद आश्रम’ येथे दुपारी 2.30 वाजता पक्षाचे सर्व खासदार, मंत्री, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्यात एका बाजूला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पूर्णेकर हत्या प्रकरणावरून उफाळलेले हे राजकीय वादळ आता सत्ताधारी आणि विरोधकांमधील थेट संघर्षात रूपांतरित झाले आहे. ———————————————————— हेही वाचा… आम्ही नवा पक्ष स्थापन करून राष्ट्रीय पक्षांच्या नाकात दम आणणार: पराभवानंतर कराळे मास्तरांची घोषणा, म्हणाले- वंजारींनी स्वतः श्रेय घेऊ नये नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजय मिळवला असला, तरी या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा राहिली ती अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांची. तब्बल २४ हजारांहून अधिक मते घेत त्यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळवले होते. आता निकाल स्पष्ट झाल्यानंतर नितेश कराळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांच्या विजयाचे श्रेय घेऊ नका असा टोला लगावला आहे, तर दुसरीकडे स्वतःचा नवा पक्ष स्थापन करून आगामी निवडणुका लढवण्याची मोठी घोषणाही त्यांनी केली आहे. सविस्तर वाचा What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 13 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation संजय गायकवाडांचं वक्तव्य बेशरमपणाचं:हे सगळं अमित शहांच्या इशाऱ्यावर ठरवून चाललंय, एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राची माफी मागावी- राजू शेट्टी हिंगोलीत मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा फास!:हप्ते फेडण्यासाठी भूमिहीन शेतमजुरांनी विक्रीला काढले राहते घर, पालकमंत्र्यांवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप