भोंदू एरंडेच्या कार्यालयातून सापाची कातडी-पक्ष्यांचे अवयव जप्त:खरात प्रमाणेच दिल्या 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला'च्या घोषणा

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-07t105200217_1775539311.jpg




स्वतःला पत्रकार आणि कन्सल्टंट म्हणवून घेणाऱ्या रवींद्र नारायण एरंडे (63) याच्या लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या प्रकरणाने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडवून दिली असून, पीडित महिलांच्या तक्रारींनंतर त्याच्या पोलिस कोठडीत 10 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी एरंडेच्या कार्यालयातून सापाची कात आणि पक्ष्यांचे अवयव जप्त केल्याने, सुशिक्षित आणि प्रतिष्ठित मुखवटा ओढलेल्या या नराधमाचा भोंदूगिरीचा काळा चेहराही आता समोर आला आहे. दरम्यान, न्यायालयातून बाहेर पडल्यावर अशोक खरातप्रमाणेच ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’च्या घोषणा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशोक खरातच्या प्रकरणाप्रमाणेच रवींद्र एरंडेने देखील महिलांना विविध आमिषे दाखवून भोंदूगिरी केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. सातपूर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता, तेथे सापाची कात, पक्ष्यांचे अवयव आणि कवडी यांसारख्या संशयास्पद वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. या वस्तूंचा वापर तो महिलांना वश करण्यासाठी किंवा त्यांना भीती घालण्यासाठी करत असावा, असा संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने कसून तपास सुरू आहे. तसेच पोलिसांनी त्याच्या कार्यालयातून आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत. तपासादरम्यान एरंडेच्या जाळ्यात अडकलेल्या 8 महिलांची ओळख पटली असून, पोलिसांनी आवाहन केल्यानंतर अनेक पीडितांनी धैर्याने पुढे येत आपली कैफियत मांडली आहे. नोकरीचे आमिष दाखवून किंवा विविध प्रकारे फसवणूक करून या महिलांची शारीरिक आणि मानसिक पिळवणूक केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिस सध्या या महिलांची गोपनीयता राखून त्यांचे प्रबोधन करत आहेत, तसेच त्यांच्या तक्रारी रीतसर नोंदवून घेण्याची कायदेशीर प्रक्रिया अत्यंत संवेदनशीलतेने राबवली जात आहे. एरंडेकडूनही ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’च्या घोषणा सोमवारी (6 एप्रिल) पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी न्यायालयाला तपासातील प्रगतीबाबत सविस्तर माहिती दिली, ज्याची दखल घेत न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून रवींद्र एरंडेच्या कोठडीत 10 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. विशेष म्हणजे, न्यायालयातून बाहेर पडताना आपली ओळख लपवण्यासाठी चेहरा झाकून घेतलेल्या एरंडेने “नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला” अशी घोषणाबाजी केल्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त होत होते. या प्रकरणातील भोंदूगिरी आणि लैंगिक शोषणाचे धागेदोरे आता अधिक खोलवर तपासले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed