९० टक्क्यांहून अधिक मतदारांचे मॅपींग पूर्ण करणाऱ्यांमध्ये ‘टॉप टेन बीएलओ’:जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला गौरव; प्रशासनातर्फे कौतुकाची थाप
![]()
प्रतिनिधी | अमरावती मतदार यादीचे सखोल पुनरिक्षण करुन ती अगदी निर्दोष व निकोप व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने विशेष मोहीम आखली आहे. ही मोहीम थेट नागरिकांच्या दारापर्यंत केव्हा पोहोचणार हे अद्याप ठरायचे असले तरी त्याची पूर्वतयारी मात्र सुरु झाली आहे. या पूर्वतयारीसाठी सध्याच्या यादीची सन २००२ च्या यादीशी जुळवणूक (मॅपींग) सुरु आहे. हे काम ब्लॉक लेवल ऑफीसर (बीएलओ) असलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून केले जात असून त्यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक मॅपिंग पूर्ण करणाऱ्या सुपरवायझर व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. टॉप टेन ठरलेल्या या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज आणि उपजिल्हाधिकारी (महसूल) विवेक जाधव यांच्या हस्ते या बीएलओंना पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. यामध्ये पर्यवेक्षक वसीम फरहत, अविनाश देशमुख व जयश्री गजभिये (पर्यवेक्षीय अधिकारी) यांच्यासह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी वृषाली मोहोड (९९.७८ टक्के), सारिका काळे (९१.९० टक्के), प्रज्ञा मोकळे (९२ टक्के), अभय मुळे (९१ टक्के), शिवलाल बोरकर (९७ टक्के), वैशाली मोरे (९८.०४ टक्के) आणि हर्षल गिरकुंजे (९५.४२ टक्के) यांचा समावेश आहे. इतरांसाठी ‘रोल मॉडेल’ क्षेत्र भेटीदरम्यान इतर बीएलओंशी हितगुज करताना अप्पर जिल्हाधिकारी गोविंद दानेज आणि उपजिल्हाधिकारी विवेक सोळंके यांनी त्या कामगिरीला ‘रोल मॉडेल’ ची उपमा दिली आहे. त्यांच्यामते इतर बीएलओंनीसुद्धा अशीच कामे करुन प्रशासनातर्फे कौतुकाची थाप मिळवावी. सुपरवायझर आणि बीएलओ म्हणून ज्यांनी उत्कृष्ट काम केले, त्यांच्याकडून इतरांनी टिप्स घ्याव्या, अशी सूचनादेखील ते या भेटीदरम्यान देत आहेत.
