नागपूरमधील एका घरात बनावट नोटा छापण्याचा गोरखधंदा उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, नोटा छापण्यासाठी लागणारे संशयास्पद कागद पाहिल्यानंतर खुद्द घरमालकानेच सतर्कता दाखवत पोलिसांना याची माहिती दिली. या कारवाईसंदर्भात नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी कारवाईबाबत विचारण्यात आले असता त्यांनी, “पोलिस टप्प्यात आल्यावरच करेक्ट कार्यक्रम करतात,” असे सूचक विधान केले. ज्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. नागपूरच्या ड्रग सिंडिकेटमधील प्रमुख आणि तब्बल 45 गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड विशाल ऊर्फ फल्ली गुप्ता याला अटक करण्यात नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईची माहिती देण्यासाठी आयोजित विशेष पत्रकार परिषदेत नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. गेल्या चार आठवड्यांत नागपूर पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या (एनडीपीएस) चार टोळ्यांवर ‘मोक्का’अंतर्गत धडक कारवाई केली असून, ‘नशामुक्त नागपूर’च्या दिशेने टाकलेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. नागपूर ग्रामीण महसूल खापरखेडा येथील एका प्रकरणातील तपासावर विचारले असता विश्वास नांगरे पाटील यांनी जे उत्तर दिले त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी म्हटले की, आरोपी करेक्ट टप्प्यात येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. तो करेक्ट टप्प्यात आला तर करेक्ट कार्यक्रम करणार, असे उत्तर नांगरे पाटील यांनी दिले आहे. नागपूर पोलिसांनी या महिन्यात धडक कारवाईची मालिकाच सुरू ठेवली आहे. शहरातील अमली पदार्थांच्या तस्करांवर (ड्रग्ज गँग) कडक कारवाई करत चार टोळ्यांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत ‘मोक्का’ लावला आहे. तसेच, एटीएस आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून वाठोडा पोलिस स्टेशन हद्दीतून 87 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत आरोपीला अटक केली आहे. दुसरीकडे, नागपुरातील प्रसिद्ध ढोमणे ज्वेलर्समधील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला थेट अंदमान-निकोबारमधून बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे. तर दसऱ्याच्या दिवशी उत्तर प्रदेशात झालेल्या शिवा शर्मा खून प्रकरणात श्रद्धा दुबेसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्व कारवायांसोबतच, आगामी सणासुदीच्या काळात शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतूक आणि सुरक्षेवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search