[ads1]
![]()
नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत हद्दीत देशी दारूच्या तिसऱ्या दुकानासाठी अर्ज आल्याने महिला आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली महिलांनी तयारी सुरू केली आहे. नागरिकांच्या हिताचा विचार करून तिसऱ्या दारू दुकानाला परवानगी देऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. या संदर्भात नुकतेच नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सध्या बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असून शेतकऱ्यांच्या समस्याही आहेत. अशा परिस्थितीत दारूची दुकाने वाढवण्याची गरज काय, असा सवाल नागरिक करत आहेत. दारूचे दुकान हा केवळ व्यवसायाचा विषय नाही, तर त्याचा परिणाम कुटुंबव्यवस्था, महिलांची सुरक्षा, मुलांचे शिक्षण आणि तरुणांच्या भविष्यावर होतो, अशी जनवादी महिला संघटनेची भूमिका आहे. त्यामुळे त्यांनी या दुकानाला विरोध केला असून, प्रसंगी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. “आम्हाला विकास हवा, विनाश नको!” असा निर्धार व्यक्त करत महिलांनी मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी केली. निवेदन देताना जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा कोषाध्यक्ष प्रांजली शिंदे, आसमा परवीन, शशिकला घोडाम, अलकाबाई सुने, अर्चना उईके, माधुरी वट्ठी, कविता मसराम, तेजस्विनी शिंदे, कांचन शिंदे, मोनाली शिंदे, जयश्री शिंदे, पूजा शिंदे आदी उपस्थित होत्या. नांदगाव खंडेश्वर शहरात आधीच देशी दारूची दोन दुकाने आहेत. यामुळे समाजावर काय परिणाम होत आहे, हे माहीत असताना आणखी एका दुकानाची काय गरज, असा प्रश्नही जनवादी महिला संघटनेने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात विचारला आहे. जनवादी महिला संघटनेच्या प्रांजली शिंदे म्हणाल्या, “नांदगाव शहरात रोजगार नाही. प्रशासनाने रोजगाराकडे लक्ष द्यावे. वाढलेल्या अवैध दारू व्यवसायाविरोधात महिलांना एकत्र करून भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल.”
[ads2]
नांदगावात तिसऱ्या दारू दुकानाला महिलांचा तीव्र विरोध:जनवादी महिला संघटनेने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देत दिला आंदोलनाचा इशारा
















Leave a Reply