[ads1]
![]()
पुण्यात कारवर महाराष्ट्र विधानसभा सदस्य असल्याचा बनावट लोगो आणि स्टिकर लावून फिरणाऱ्या दोघांविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट ओळख निर्माण करून वाहनाचा वापर केल्याचा हा प्रकार वाहतूक पोलिसांच्या लक्षात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, केंद्रीय मोटार वाहन नियम आणि मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली आहे. वाहतूक विभागात काम करणारे सुधीर कैलास साबळे (वय ३७) हे १० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सरकारी गाडीतून वाकड परिसरातील पार्क स्ट्रीट सोसायटीजवळून जात होते. त्यावेळी त्यांना एमएच १४ केक्यू ०१२५ क्रमांकाची काळ्या रंगाची एक कार संशयास्पदरित्या जाताना दिसली. पोलिसांनी या कारचा पाठलाग केला असता, चालकाने गाडी घेऊन अधिवास हॉटेलसमोरून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव बापू मच्छिंद्र डेरे (वय ३५, रा. धावडे वस्ती, बाबा आनंद कार्यालयाजवळ, भोसरी) असे सांगितले. चौकशीत गाडीचा मालक रोहन जगन्नाथ काटे (रा. पांडुरंग विहा, काटे नगर, पिंपळे सौदागर, पुणे) असल्याचे उघड झाले. पोलिसांच्या लक्षात आलेल्या या कारच्या काचेवर पांढरा-हिरवा रंगाचा गोल लोगो होता. त्यात ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य’, अशोकस्तंभ आणि ‘आमदार’ असा मजकूर होता, असे तक्रारीत म्हटले आहे. या लोगोबद्दल विचारणा केली असता, चालकाने समाधानकारक उत्तर दिले नाही, असा आरोप आहे. या प्रकारामुळे गाडीतून फिरणाऱ्या व्यक्तीला आमदार असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार वाकड पोलिसांनी बापू डेरे आणि गाडीमालक रोहन काटे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २०५, केंद्रीय मोटार वाहन नियम कलम १००(२) आणि मोटार वाहन कायदा कलम १७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक रमेश कुंडलिकराव शिरसाट करत आहेत.
[ads2]
कारवर आमदार असल्याचा बनावट स्टिकर:पुण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, बनावट ओळख निर्माण करून वाहनाचा वापर केल्याचा आरोप
















Leave a Reply