[ads1]
![]()
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुषंगाने दिशाचे वडील सतीश सालियन यांनी सीबीआय कार्यालयात जाऊन आपला जबाब नोंदवला. तब्बल चार तासांच्या प्रक्रियेनंतर ते सीबीआय कार्यालयातून बाहेर पडले असून, लवकरच याप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल होईल, अशी माहिती त्यांचे वकील निलेश ओझा यांनी दिली. उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवून तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. तसेच, मालवणी पोलिसांनी तपासाचा सर्व तपशील आणि या प्रकरणाचे संपूर्ण रेकॉर्ड सीबीआयकडे सुपूर्द करावेत, असे आदेशही न्यायालयाने दिल्याचे वकिलांनी स्पष्ट केले. युक्तिवाद फेटाळले अन् तपास अधिकाऱ्याची नियुक्ती या याचिकेवरील सुनावणीदरम्यान आदित्य ठाकरे आणि सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सीबीआयने या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी उपअधीक्षक पुरण कुमार यांची तपास अधिकारी म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे. दोन दिवसांत एफआयआर आणि रिया चक्रवर्तीचा उल्लेख “न्यायालयाच्या आदेशानुसार जबाब नोंदवण्यात आला असून तो एफआयआरला जोडला जाईल. येत्या दोन दिवसांत सीबीआयच्या संकेतस्थळावर एफआयआर उपलब्ध होईल,” असे वकील ओझा यांनी सांगितले. सुशांत आणि दिशा या दोघांच्या केसेस एकमेकांशी निगडित असून त्यात रिया चक्रवर्तीची मोठी भूमिका असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, “सचिन वाझेचे एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन आमच्याकडे आहे. सतीश सालियन यांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांनी दिलेल्या आरोपींच्या नावानुसारच हा चार तासांचा जबाब नोंदवण्यात आला आहे,” अशी माहितीही त्यांनी माध्यमांना दिली. आरोपींना अटक करण्याची वडिलांची मागणी सीबीआय कार्यालयात आपला जबाब नोंदवल्यानंतर दिशाचे वडील सतीश सालियन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “मी सीबीआयकडे माझा सविस्तर जबाब नोंदवला असून त्यामध्ये आरोपींची नावेही दिली आहेत. आता या नावांनुसार तातडीने गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक करण्यात यावी,” अशी थेट मागणी सतीश सालियन यांनी केली आहे.
[ads2]
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयची एन्ट्री:आदित्य ठाकरेंचा युक्तिवाद फेटाळला, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वडिलांचा जबाब नोंदवला
















Leave a Reply