[ads1]
- Marathi News
- National
- 6 Thousand Kashmiri Pandit Employees In Jammu And Kashmir Are In Fear, Kashmiri Pandits Are Confined To Their Homes Even Before Evening; They Are Not Going To The Office, Some Have Gone From The Valley
मुदस्सीर कुल्लू | शेखूपुरा/कुलगाम6 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

बडगाम जिल्हा मुख्यालयापासून ३ किमी अंतरावर शेखूपुरा. जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडित कुटुंबांची दुसरी सर्वात मोठी वसाहत. सुमारे ३३० कुटुंबे १२ फूट उंच संरक्षक भिंतीच्या आत सध्या दहशतीचे जीवन जगत आहेत. एका महिन्यापूर्वीपर्यंत त्यांना वसाहतीतून बाहेर येण्या-जाण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नव्हती, पण आता वसाहतीच्या गेटवर तैनात जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ कमांडोंना प्रत्येक तपशील लिहून द्यावा लागत आहे. ओळखपत्र गळ्यात लटकवून ठेवावे लागत आहे. येथून बाहेर पडताना जवान स्पष्ट शब्दांत समजावून सांगत आहेत की संध्याकाळी ४ वाजेपूर्वी परतायचे आहे. सध्या हाच प्रोटोकॉल आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये २००८ च्या पीएम पॅकेजअंतर्गत सुमारे ६ हजार काश्मिरी पंडितांना नोकरी आणि निवासस्थान देण्यात आले आहे. हे लोक शेखूपुरा, कुलगाममधील वुस्सू कॅम्प, बारामुल्ला, कुपवाडामध्ये कुटुंबांसह राहत आहेत. या वसाहती २४ तास सुरक्षा घेऱ्यात राहतात. यामध्येही सर्वाधिक ४२६ कुटुंबे वुस्सूमध्ये आहेत. गेल्या एका महिन्यात लष्करशी संबंधित अतिरेकी संघटना यूएलसीचे सहा पोस्टर/चिठ्ठ्या सोशल मीडिया आणि परिसराच्या भिंतींवर काही ठिकाणी चिकटवलेल्या आढळल्या आहेत. धमक्यांनंतर अनेक कर्मचाऱ्यांनी कार्यालयात जाणे सोडले आहे, तर काही जम्मूमध्ये परतले आहेत.
भास्कर टीम जेव्हा वसाहतीत पोहोचली तेव्हा सुरक्षा दलांनी आत जाऊ दिले नाही. तथापि, वसाहतीच्या २०० मीटरच्या परिसरात काही दुकाने आहेत, जिथे पीएम पॅकेजअंतर्गत २०१० मध्ये शेखूपुरा येथे येऊन स्थायिक झालेल्या काश्मिरी पंडित कुटुंबांशी चर्चा झाली. यापैकीच एका कुटुंबाने ओळख उघड न करण्याच्या अटीवर चर्चा केली. त्यांनी सांगितले की, आता डॉक्टरांकडे जाणे किंवा रेशन आणणे यासारख्या सामान्य कामांसाठीही जवानांना पूर्वकल्पना द्यावी लागत आहे.
आम्ही तर कसेतरी कार्यालयात जाणे टाळत आहोत, पण मुलांचे काय करायचे? त्यांना शाळेत पाठवून दिवसातून दहा वेळा फोन करून त्यांची खुशाली विचारावी लागते. अनेक कुटुंबे येथून निघून गेली आहेत. काश्मिरी पंडित संघर्ष समितीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा एका विभागाद्वारे एक-दोन दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांचा डेटा गोळा करण्यात आला, तर तो इतक्या लवकर अतिरेक्यांच्या हाती कसा पोहोचला? आम्ही याची चौकशी करण्याची मागणी करत आहोत.
आणखी एका कुटुंबाने सांगितले की, वसाहतीच्या आत कोणतीही दहशत नाही, कारण येथे आमच्या सुरक्षेसाठी प्रत्येक वेळी पोलिस जवान उपस्थित असतात. बाहेरही आता संरक्षक भिंतीच्या चारही बाजूंनी ४ ते ६ पोस्ट बनवण्यात आल्या आहेत, जिथे पोलिस असतात. शाळेच्या बसेस आत येत नाहीत. आम्हाला मुलांना गेटवरच सोडावे आणि आणावे लागत आहे.
मुस्लिम साथ नसते देते तर इतकी वर्षे थांबू शकलो नसतो
वुस्सू कॅम्पबाहेर एका दुसऱ्या काश्मिरी कुटुंबाने सांगितले की, त्यांच्या मुस्लिम शेजाऱ्यांसोबतचे संबंध सलोख्याचे आहेत आणि त्यांच्या सहकार्याशिवाय इतकी वर्षे थांबणे शक्य नव्हते. मात्र, ते आता आपल्या कामाच्या ठिकाणी ‘सिक्युअर झोन’ आणि लीकच्या सखोल चौकशीची मागणी करत आहेत.
डेटा कसा लीक झाला, चौकशी सुरू
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सुरक्षा दलांना या धमक्या अत्यंत गांभीर्याने घेण्याचे व गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘एजन्सी धमक्यांची सत्यता आणि डेटा लीकच्या स्रोताची चौकशी करत आहेत. पंडित कर्मचाऱ्यांना सुरक्षा दिली जाईल.’
शेखूपुरा कॅम्प
दक्षिण काश्मीरच्या वुस्सू कॅम्प व आसपासही अशीच शांतता दिसली. येथे कॅम्पबाहेर सनी रैना यांनी सांगितले की, आम्ही १९९० मध्ये खोरे सोडून गेलो होतो. पंतप्रधान पॅकेजअंतर्गत आम्ही २०१० मध्ये आपल्या मुळांशी जोडण्याच्या आशेने परत आलो होतो, परंतु आज १२ फूट उंच भिंतींच्या मागे हे ट्रान्झिट कॅम्प आमच्यासाठी तुरुंगासारखे बनले आहेत. परिस्थिती अशी आहे की वसाहतीचे गेट उघडते किंवा फोन वाजतो, तेव्हा या कुटुंबांच्या हृदयाची धडधड वाढते.
१२ फूट उंच भिंतींमागे हे ट्रान्झिट कॅम्प तुरुंगासारखे…
श्रीनगर | लष्कर-ए-तैयबाशी संबंधित अतिरेकी संघटना युनायटेड लिबरेशन कौन्सिल (यूएलसी) ने काश्मिरी पंडितांच्या नावे आणखी एक चिठ्ठी जारी केली. एका महिन्यातील ही सहावी चिठ्ठी आहे. या वेळी पीएम पॅकेजअंतर्गत येथे काम करणारे काश्मिरी पंडित कर्मचारी निशाण्यावर आहेत. अतिरेक्यांनी या कर्मचाऱ्यांचे फोन नंबर, पत्ता व गाड्यांचा तपशीलही मिळवला आहे. चिठ्ठीत बिगर स्थानिक कर्मचाऱ्यांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्याची धमकी दिली आहे. यानंतर काश्मिरी पंडितांची संघटना ऑल पीएम पॅकेज एम्प्लॉइज असोसिएशनने पंतप्रधान व उपराज्यपालांकडे चौकशी करण्याची आणि सुरक्षेची मागणी केली आहे.
[ads2]
















Leave a Reply