Advertisement

वाळू माफियांचा नायब तहसीलदारावर हल्ला – VastavNEWSLive.com


नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वाळू माफियांनी हौदोस घातला असून महसुल प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासवरही जिवघेणे हल्ले वाळू माफीयांकडून नेहमीचेच झाले आहेत. यातच शनिवारी रात्री नायब तहसिलदारांच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला. रविवारी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
नांदेड जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव प्रलंबित आहे. महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस यंत्रणेने वाळू माफियांविरुद्ध कारवाई सुरू केली असली, तरी त्यांची मुजोरी मात्र कमी झाली नाही. सिडको, सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कारवाया केल्या असल्या, तरी लिंबगाव, मुदखेड, भोकर, किनवट, हिमायतनगर, माहूर, नाळेश्वर, राहटी, शंखतीर्थ या भागातून अवैधरित्या वाळू उपसा सुरूच आहे.
विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा या व्यवसायात समावेश असल्याने कारवाया करताना प्रशासनही हतबल होत आहे. शनिवारी रात्री नांदेडचे नायब तहसिलदार स्वप्नील दिग्गलवार हे आपल्या पथकासमवेत वाडी पाटी येथे कारवाई करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर वाळू माफियांनी दगडफेक केली. त्यांच्या समवेत दोन तलाठी, कौतवाल व पोलीस कर्मचारी होते. दगडफेक केल्यानंतर संंबंधित वाळू माफियांनी पथकाने पकडलेला हायवा पळवून नेला. विशेष म्हणजे हायवा गाडी लातूर जिल्ह्याच्या पासिंगची होती.
शहरातील असर्जन, विष्णुपुरी भागात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत आहे. त्याच्या तक्रारी आल्यानंतर कारवाई करण्यासाठी हे पथक गेले होते. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले, तरी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. घडलेल्या प्रकारानंतर नायब तहसिलदार स्वप्नील दिग्गलवार यांनी ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. तेेथे रितसर तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. शिवाय हायवा गाडी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिली.
वाळू माफियांची मुजोरी वाढत चालली आहे. शनिवारच्या घटनेत आमच्या जीविताला धोका झाला नाही. आमचे नशीब बलवत्तर म्हणून आम्ही दगडफेकीतून वाचलो. कारवाई करण्यासाठी गेलेलो असताना जवळपास 50 ते 60 जणांचा जमाव अचानक तेथे जमला. विशेष म्हणजे पोलीस कर्मचारीही आमच्यासोबत होते. याबाबत रितसर तक्रार नोंदवली असून भविष्यात वाळू माफियांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
– स्वप्नील दिग्गलवार
नायब तहसिलदार, नांदेड


Post Views: 4






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?