Advertisement

महानगरपालिकेच्या इमानदार अधिकाऱ्यांनी माठ फोडून गाजवली मर्दुंमकी


नांदेड(प्रतिनिधी)-वातानुकुलूत कक्षांमध्ये बसून सर्वसामान्य माणसांवर अतिक्रमण, कर कार्यवाही, नाव बदलण्याचे कार्यवाही, गुंठेवारीची कार्यवाही यामध्ये काय-काय महानगरपालिकेत घडते. याचे विश्लेषण लिहिण्याची गरज नाही. मागे काही दिवसांपुर्वी शक्तीपिठ समृध्दी महामार्गाच्या भुसंपादनात शेतकऱ्यांनी आमच्या जागेत पुन्हा पाय ठेवला तर याद राखा असा सज्जड दम दिला होता. त्याचा पंचनामा तयार करण्यात आलेला आहे. आता असेच महानगरपालिकेच्या हद्दीत राहणारे नागरीक महानगर पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल करणार नाहीत याचा काही नेम नाही. लिहिण्याचे कारण असे आहे की, दोन दिवसांपुर्वी काही गरीब कामगारांनी उन्हाळ्यामध्ये ठंड पाणी देणारे मातीचे माठ विक्री करण्यासाठी रस्त्यावर ठेवले होते. त्या माठांना पोकलॅंडने नेस्तनाबुत करून महानगरपालिकेने काय मिळवले. हा प्रश्न आहे. हे काम करत असतांना शहरात अनेक इमारतींच्या पायऱ्या पादचारी रस्त्यावर आहेत. त्या महानगरपालिकेला दिसल्या नाहीत. वारे महानगरपालिका म्हणूनच ऍड. नितीन सोनकांबळे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नालायक अधिकारी अशी बिरुदावली देवून ज्या कुटूंबाचे माठ महानगरपालिकेने नष्ट केले त्यांना आर्थिक मदत केली आहे. एवढेच नव्हे तर या कुटूंबाला मदत करू असे आवाहन सर्वत्र सुरू आहे.
बेकायदेशीर कामांना रोखणे हे प्रशासनाचे काम आहे. पण हे काम करत असतांना एक व्यक्ती लाडका आणि दुसरा बिना लाडाचा असा समज त्यांना करता येणार नाही. त्यांच्यासाठी अर्थात कायद्यासमोर सर्वच व्यक्ती एक आहेत. तो व्यक्ती दररोज मोलमजुरी करून 200-400 रुपये कमवणारा असेल किंवा वातानुकूलीत कक्षात बसून लाखो रुपयांची गंडवणुक करून लोकांना फसवणारा असेल. मागील काही दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहिम सुरू आहे. श्रीनगर भागात विद्यानगरसमोर असलेल्या पादचारी रस्त्यावर अनेक दुकाने थाटलेली होती. त्यात दोन शटर सुध्दा आहेत. पादचारी रस्त्यावर बसलेल्या गाडीवाले आपल्या गाड्या घेवून पळून गेले. याच ठिकाणी एक कुटूंब मातीने तयार केलेल्या माठांची विक्री करत होते. त्यासाठी दररोज तयबाजारीची पावती महानगरपालिकेकडून तो घेत होता. मग ते अतिक्रमण कसे होईल. जास्ती जास्त त्याला तुझे साहित्य काढून घे असे सांगून त्याला वेळ द्यायला हवा होता. परंतू महानगरपालिकेचे अनेक इमानदार अधिकारी आणि त्यांच्या दिमतीला सुरक्षा म्हणून पोलीस असा मोठ्या ताफ्याने अतिक्रमण काढण्याचा जो मार्ग अवलंबला आहे. तो अत्यंत चुकीचा आहे. सोबत पोकलॅंड, पोलीस काय करेल तो व्यक्ती. ज्यांच्या दुकानासमोरील छत पाडले. ते ठिकही आहे. पण रस्त्यावर बसून जनतेसाठी थंड पाण्याची सोय देणारे माठ विक्री करणाऱ्या कुटूंबावर महानगरपालिकेने केलेला अन्याय झारशाही पेक्षा अन्यायकारक आहे. पोकलॅंडने त्या माठांना स्पर्श करताच ते शेकडो माठ एका झटक्यातच चेंदा-मेंदा झाले. त्या ठिकाणी असणाऱ्या महिला रडत होत्या, आम्ही आमचे साहित्य उचलून घेतो म्हणत होत्या तरीपण त्या आश्रुंचा परिणाम महानगरपालिकेच्या इमानदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काहीच झाला नाही.
ज्या-ज्या ठिकाणी हे अतिक्रमण काढण्यात आले आहे आणि प्रसिध्दी पत्रकांद्वारे प्रसिध्दीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्या प्रत्येक रस्त्यावर अशा अनंत इमारती आहेत. ज्यांच्या पायऱ्या महानगरपालिकेच्या नालीवर, महानगरपालिकेने तयार केलेल्या पादचारी रस्त्यांवर स्पष्टपणे दिसतात. मग त्या पायऱ्या का पाडल्या नाहीत. हा प्रश्न त्या माठवाल्यांनी विचारला तर काय हाल होतील. तो व्यक्ती कच्चा मालासाठी कर्ज घेवून माठ तयार करून तो विक्री करत होता आणि त्या विक्रीतून आपले कर्ज फेडणार होता. नाही तर भारतात करोडो अब्जो रुपये कर्ज घेवून भारत सोडून पळून जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. जेंव्हा एखादा व्यक्ती इतरांच्या कामांबद्दली न्यायाधीश होतो आणि स्वत:च्या कामाबद्दल वकील बनतो तो व्यक्ती या जगातील सर्वात बोगस व्यक्ती आहे. तुम्ही अधिकारी बनला आहात ती जनतेची सेवा करण्यासाठी त्यांचा सुड घेण्यासाठी नाही.
हे पायऱ्या अतिक्रमण नाहीत काय?

 

या घटनेवर नांदेड येथील प्रसिध्द ऍड. नितीन सोनकांबळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नालायक अधिकारी असा उल्लेख महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबद्दल केलेला आहे. त्यांच्या मते कोणतेही अतिक्रमण काढण्याअगोदर त्या व्यक्तीला नोटीस देणे आवश्यक आहे. पण महानगरपालिकेने असे काहीच केलेले नाही. नितीन सोनकांबळे यांनी ज्या कुटूंबाचे माठ महानगरपालिकेेने फोडले आणि अगोदरच ते रस्त्यावर असतांना त्या रस्त्यावरून सुध्दा उठवले. त्यांना 5 हजार रुपये आर्थिक मदत देवून आपली सामाजिक जबाबदारी पुर्ण केली आहे.
या शिवाय सुध्दा महानगरपालिकेकडे कर वसुली विभाग आहे, गुंठेवारी विभाग आहे, नाव बदलण्याचा विभाग आहे. या सदरांमध्ये तर वाताणुकूलीत कक्षात बसून काय-काय केले जाते, करदात्यांना काय-काय त्रास दिला जातो असाच प्रकार घडणार असेल तर शक्तीपिठ महामार्गावर शेतकऱ्यांनी घेतलेली भुमिका नांदेड शहरातील नागरीक तशीच भुमिका घेणार नाहीत काय आणि ती भुमिका घेतली तर त्यांचे काय चुकले. तुम्ही अधिकारी झाला आहात म्हणजे जनतेचा गळाच कापणार आहात काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची गरज आहे.


Post Views: 5






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?