नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड म्हणजे मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी, हैदराबाद मुक्ती संग्रामात छातीवर गोळ्या झेलून शहीद झालेल्यांचा वारसा, समाजकारणात आणि राजकारणात ही देशपातळीवर दिलेले योगदान हे पाहता आपली ओळख सुसंस्कृत म्हणूनच असायला पाहिजे. पण ज्या हुतात्म्यांच्या स्मृतीला नतमस्तक व्हावे त्या स्मारकाच्या चबूतऱ्यावर हुल्लड बाजी करून घाणेरड्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे, स्मारकाच्या समोरच केलेली घाण, मटण आणि बिर्याणीचे पार्सल, प्लास्टिकच्या पिशव्यांनी सगळ्या गार्डनची वाढवलेली शोभा हे अत्यंत लाजिरवाणे आणि टोकाच्या असंस्कृतपणाचे लक्षण आहे.
शहीदांचा हा ढळढळीत अपमान असून याला महापालिका प्रशासनाची मूक संमती असल्याचेच म्हणावे लागेल. खर पाहता नांदेडमध्ये मध्यवर्ती ठिकाणी एवढे सुंदर आणि बऱ्यापैकी मोठे गार्डन आहे, प्रशासनाच्यावतीने ही त्याची योग्य काळजी घेतली जाते. पण या चांगल्या गार्डनची होत असलेली परिस्थिती आपण नांदेडकर म्हणून, प्रशासनातील आयुक्त असो किंवा गार्डनची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते अधिकारी असो किंवा या जिल्ह्याचे राजकीय दृष्ट्या नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी असो अशा सगळ्यांसाठी भूषणावह निश्चितच नाही. आपल्या ज्या पूर्वजांनी आपल्याला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी छातीवर गोळ्या झेलून शहीद झाले. निदान त्यांच्या पावन स्मृतींचा तरी आदर कराव. हे ही शिकवणे लागत असेल तर ते आपले दुर्भाग्यच. खर पाहता गार्डनमध्ये बिर्याणी, मांसाहार, इतर खाद्यपदार्थ, प्लास्टिकच्या पिशव्या, केकच्या आणि इतर पार्ट्या हे किती संयुक्तिक आहे. बिर्याणी आणि मांसाहार जिथे होणार तिथे कुत्रे आणि इतर प्राणी येणारच की? महापालिका प्रशासनाने आणि विशेषत: ज्यांच्याकडे गार्डनचे व्यवस्थापन आहे त्या अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिले पाहिजे. ती त्यांची जबाबदारी देखील आहे. नांदेडमध्ये गुरुद्वारा साहिबचे पण प्रशस्त आणि सुंदर गार्डन आहे. त्याठिकानची स्वच्छता आणि नीटनेटकेपणाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. नांदेड महानगरपालिकेचे हे गार्डन सुद्धा सुंदर होऊ शकते फक्त कागदावर असलेल्या नियमांची अंमलबजवानी आणि मानसिकता पाहिजे.
Leave a Reply