तरुण पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी अभिनव उपक्रम
नांदेड– जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या पोलीस दलाने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी मिशन उडान योजनेअंतर्गत शनिवार,दि.३ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता पोलीस मुख्यालय नांदेड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सलग अठरा तास अभ्यास हा उपक्रम जिल्हा पोलीस दलाने राबविला होता.त्या पाठोपाठच भरकटत चाललेल्या तरुणाईसाठी सामाजिक जाणिवेच्या भावनेतून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून,त्यांच्या आयुष्याचे सोने करण्याचा हा अभिनव उपक्रम सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य असलेल्या पोलीस दलाने हाती घेतला आहे.
सदर मेळाव्यात दहावी,बारावी,पदवीधर,पदव्युत्तर असलेल्या व वयाची 18 ते 40 वयोमर्यादा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.सदर मेळाव्या मध्ये 25 पेक्षा जास्त कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून दोन हजारापेक्षा जास्त तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
ज्यांची निवड रोजगार उपलब्धतेसाठी होईल त्यांना अंदाजे कमीत कमी 12000 ते 35000 वेतन मिळण्याची शक्यता आहे.सदर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.त्यासाठी पोलीस दलाच्या वतीने क्यू आर कोड उपलब्ध करून दिलेला आहे.त्या क्यू आर कोड च्या माध्यमातून संबंधितांनी नाव नोंदणी करावी.काही अडचण वाटल्यास 8308274100 व 7774089100 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
या सुवर्णसंधीचा नांदेड जिल्ह्यातील युवक युवतींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे व पोलीस उपअधीक्षक ( गृह) डॉ.अश्विनी जगताप यांनी केले आहे.
Leave a Reply