नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगरमध्ये तिन वेगवेगळ्या प्रकारचे खत साठे 7 लाख 59 हजार 472 रुपये किंमतीचे आणि ज्या वाहनामध्ये हा खत साठा आला होता. ते 5 लाख रुपयांचे वाहन असा एकूण 12 लाख 59 हजार 472 रुपयांचा मुद्देमाल हिमायतनगर पोलीसांनी जप्त केला आहे. हा अवैध खत साठा तेलंगणा राज्यातून हिमायतनगर येथे आलेला आहे. महाराष्ट्रात सुध्दा खतांच्या विक्रीबाबत वेगवेगळे प्रकार घडतात आणि त्यातून शेतकऱ्यांची लुट होतच राहते. इफ्को कंपनीच्या खतासाठी तर अत्यंत कडक नियमावली असतांना प्रशासनाच्या मार्फत त्या सर्व नियमावलींना खुंटीवर बांधले जाते आणि व्यापारी खतांचा अवैधपणे व्यवसाय करत राहतात.
कृषी अधिकारी कार्यालय हिमायतनगर येथील गुणनियंत्रक गंगाधर दत्तराम भदेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एम.एच.26 बी.ई.3295 ची तपासणी केली. त्यात असलेल्या खताच्या गोण्याबाबत एम फाम विचारला असता तो उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजे हा खत साठा बिनापरवानगी विक्रीसाठी आला होता. खत साठा तेलंगणा राज्यातून आलेला आहे. हिमायतनगर पोलीसांनी तिन वेगवेगळ्या प्रकारचे खत एकूण 7 लाख 59 हजार 472 रुपये किंमतीचे तसेच चार चाकी गाडी 5 लाख रुपयांची असा 12 लाख 59 हजार 472 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तक्रारीनुसार हिमायतनगर पोलीसांनी व्यंकय्या मारय्या कुरपाटी (42) रा.चामालोणी बावी ता.गुरमफुड जि.नलगौंडा राज्य तेलंगणा, प्रविण व्यंकटअप्पा आडेपु (22) रा.नलगौंडा(तेलंगणा), मलेशम सत्यनारायण यडला (35) रा.हैद्राबाद, खाजा नसीर खाजा वजीर (42) रा.भोकर ह.मु.हिमायतनगर या चार जणांविरुध्द खत नियंत्रण आदेश 1985 खंड 7, 5, 19(सी) -(3) क्लॉज 8(3) तसेच अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 च्या कलम 3(2)(ए)(डी), 7 प्रमाणे गुन्हा क्रमांक 79/2025 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
भोकरचे अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, ग्रामीण उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनात हिमायतनगरचे पोलीस निरिक्षक अमोल भगत, पोलीस अंमलदार शंकर जाधव, शामसुंदर नागरगोजे, पवन चौदंते, पठाण, बालाजी पाटील आणि चंद्रकांत आरकिलवार यांनी ही कार्यवाही केली.
Leave a Reply