Advertisement

राज कॉर्नर-वर्कशॉप-श्रीनगर रस्त्यावरील 110 अतिक्रमणे हटवले

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील सर्वच भागातील अतिक्रमणे काढण्यासाठी सध्या महानगरपालिकेची विशेष मोहिम सुरु आहे. त्याचाच भाग म्हणुन उत्तर नांदेड भागातील रहदारीसाठी मुख्य रस्ता म्हणुन ओळखला जाणारा राज कॉर्नर-वर्कशॉप-श्रीनगर-रेस्ट हाऊस या रस्त्यावरील रस्याच्या दुतर्फा असणाऱ्या अतिक्रमण धारकांवर महानगरपालिकेने धडक कारवाई केली असुन गुरुवार दिनांक 24 रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथक व पोलीस प्रशासनाने या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजुने झालेले अतिक्रमण काढुन टाकले आहे.
मागील काही दिवसांपासुन महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अनधिकृतपणे अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असुन मागील दोन दिवसांत दक्षिण नांदेड मधील वर्दळीच्या ठिकाणची अतिक्रमणे काढल्यानंतर आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने आपला मोर्चा उत्तर नांदेड भागातील अतिक्रमणधारकांकडे वळविला आहे. त्याअनुषंगाने उत्तर नांदेड भागातील प्रमुख रस्त्यापैकी राज कॉर्नर-वर्कशॉप-श्रीनगर-रेस्ट हाऊस या रस्त्यावरील अतिक्रमणे काढुन टाकण्याची कार्यवाही महानगरपालिका व पोलीस विभागाने संयुक्तपणे पार पाडली आहे. या कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने जवळपास 110 अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली तसेच तब्बल 02 ट्रक माल जप्त करण्यात आला आहे.
सदरील कारवाई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेंडगे,अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, राजेश जाधव, गौतक कवडे, अग्निशमन अधिकारी के. जी. दासरे, अतिक्रमण पथक प्रमुख अनिल चौदंते यांच्यासह महापालिकेचे 50 कर्मचारी तसेच पोलीस विभागातील 40 कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?