पहलगाममध्ये अतिरेक्यांनी 28 पर्यटकांची हत्या केल्यानंतर त्या हत्तेतील एका खऱ्या चित्राचे कार्टून तयार करून धर्म विचारला जात नाही असे शब्द लिहुन ते कार्टून देशभर प्रसारीत झाले आहे. नांदेडमध्ये सुध्दा त्याचा प्रसार झाला आहे. अतिरेक्यांनी काय बोलले हे पहिल्यांदा झाले नाही. 14 ऑगस्ट 1993 मध्ये किस्तवाढ येथे भारतपुत्रांना अतिरेक्यांनी मारले तेंव्हा सुध्दा त्यांनी त्या पुत्रांची ओळख पटवली होती. ज्या महिलेचे चित्र कार्टूनमध्ये बनवले ती फक्त शरिराने तेथे बसलेली होती. मनाने, काळजाने आणि आत्म्याने आपल्या पतीच्या मृत्यूमध्ये विरगळली होती आणि त्या महिलेच्या चित्राला कार्टून बनवून त्याचा प्रसार करत आहात. काय तुमच्या राजकारणाचे लेवल. खरे तर पहलगाममध्ये महाराष्ट्राच्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांना मारतांना सय्यद हुसेन शाह अतिरेक्यांना भिडला होता. त्याने अतिरेक्यांची बंदुक ओढून घेतली होती. तरी पण तो कौस्तुभ आणि संतोषचा जिव वाचवू शकला नाही उलट अतिरेक्यांनी त्याचे कपडे काढून त्याच्या शरिराची गोळ्यांनी चाळणी केली. तोही मुस्लिमच आहे ज्याने हिंदुंना वाचविण्यासाठी आपला जीव दिला. याचा उल्लेख कोणी का करत नाही. सोबतच एक ख्रिश्चन पुरूष आणि एक खिश्चन महिला आणि दोन जैन युवती यांनाही अतिरेक्यांनी मारले आहे. उगीचच हिंदुत्वाचा ठेका वाजविण्याची काही गरज नाही. त्या ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ला केल्यावर सर्वात मोठी मदत मुस्लिम लोकांनी केली आहे आणि तो वर्ग तेथे येणाऱ्या पर्यटकांना घोड्यावर बसवून प्रवास करण्याचा व्यवसाय करतो. सोबतच नजाकत अली या मुस्लिम व्यक्तीने 11 पर्यटकांचे जीव वाचवले ही बातमी कोणी दिली नाही. भारत देशात हिंदु मुस्लिम हा वाद तयार करणाऱ्या प्रत्येकाला पहेलगाममध्ये मुस्लिमांनी केलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी लाज वाटायला हवी. ज्यांच्यामध्ये दम आहे त्या सर्वांनी कश्मिरमध्ये जावे आणि घुसावे अतिरेक्यांच्या घरात कोणी रोखले आहे काय तुम्हाला. फक्त येथे पोस्टरबाजी करून काय साध्य करणार आहात. हा विषय सुध्दा एवढा महत्वाचा आहे की, त्याचे काही आज पडसाद उलट उमटले तर देशाचे काय होईल याचा विचार करा.
कश्मिरच्या पहेलगामला मिनी स्विर्झलॅंड असे म्हणतात आणि 22 एप्रिल रोजी त्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होती. खरे तर अतिरेक्यांसाठी पहेलगामला पोहचले एवढे सहज नाही आणि घटना घडल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या देशभरच्या नेत्यांनी बॅनर्स तयार करून त्यावर ते कार्टून चित्र छापून धर्म विचारला जात नाही असे लिहुन एक नवीनच थट्टा सुरू केली. त्या ठिकाणी मरणाऱ्यांच्या 26 च्या यादीमध्ये हर्षीता जैन, निकीता जैन, जेनीफर या युवतींची नावे आहेत. तसेच इंदौर येथील नाथीयाल यांचे नाव आहे हे धर्माने ख्रिश्चन आहेत. उगीचच हिंदुंनाच मारले असा कांगावा करून देशाच्या राजकारणात काही उलथापालथ करायची असेल तर तोच उद्देश घेवून अतिरेक्यांनी ही घटना घडवलेली आहे. खरे तर 19 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कश्मिरला वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यासाठी जाणार होते. पण हवामान खराब आहे या नावाखाली तो दौरा रद्द झाला. त्याच रात्री ते राष्ट्रपतींना भेटले आणि दुसऱ्या दिवशी दुबईला रवाना झाले. एकीकडे कटमुल्ला शब्दांचा वापर करणाऱ्या नरेंद्र मोदींना दुबईच्या युवराजांशी भेटण्याची काय घाई हा प्रश्न विचारला पाहिजे. दोन महिन्यापुर्वी एका पत्रकाराने आणि पाच महिन्यापुर्वी एका पत्रकाराने लवकरच हल्ला होणार आहे आणि सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये अशा बातम्या प्रसिध्द केल्या होत्या. पण त्यावर काही कार्यवाही सरकारने केलीच नाही.
खरे तर सय्यद हुसेन शाहचा केंद्र सरकारच्यावतीने सन्मान व्हायला हवा. कारण तो पर्यटकांना घोड्यावर बसवून फिरवण्याचा व्यवसाय करणारा कामगार आहे.काश्मिरमध्ये 70 टक्के नागरीकांचा उर्दनिर्वाह पर्यटनावर अवलंबून आहे. घटनेच्यादिवशी पहेलगाममध्ये सर्वात मोठी मदत या घोडेवाल्यांनीच केली. त्यांनी जखमींना खांद्यावर उचलून नेऊन दवाखान्यात भरती केले. त्यावेळी जखमीने विचारले नाही की तु कोणत्या जातीचा आहेस किंवा नेणाऱ्याने जखमींना विचारले नाही की तु कोणत्या जातीचा आहेस मग आम्ही का जातीवाद करत आहोत. आहो जातीयवाद कधीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संपवलेला आहे. त्यांचा तर आदर करा. इंदिरा गांधींची बदनामी केली जाते. परंतू दहशतवादी हल्यांचा विचार केला तर सर्वाधिक दहशतवादी हल्ले भारतीय जनता पार्टीच्या राज्यात झाले आहे. आता तुम्ही इंदिरा गांधीसारखे हृदय दाखवा. करा बांग्लादेशसारखा वेगळा देश तयार, फक्त मगरीचे आश्रु दाखवून जनता तुमच्या आश्रुंना बळी पडणार नाही. आता वॉरफ्रंडवर जाऊन अमित शाहने आपले फोटो प्रसारीत केले. ही आहे काय तुमची कार्यपध्दती. तुम्ही चार दिवसांपुर्वीच जावून आले होते ना, सुरक्षेचा आढावा घेतला होता ना. मग पहलगामचा हल्ला कसा झाला. ज्या प्रमाणे नरेंद्र मोदींसाठी हवामानाचा अंदाज तुम्हाला कळला. परंतू अतिरेकी हल्ला होणार यासाठी तुमचे जेम्स बॉंड काय करत होते. दिनेश बोरा नावाच्या पत्रकाराने ट्विट केले आहे की, आतंकवाद्यांचा हल्ला होणार याचे इनपुट मिळाले होते. त्यानंतर सुध्दा काही करण्यात आले नाही. गुप्तहेरांच्या अपयशाचा प्रश्न विचारायचा नाही काय? सुरक्षा यंत्रणेच्या अपयशाचा प्रश्न विचारायचा नाही काय?
सर्वात दुर्देवी बाब अशी आहे की, जशी पहलगामची घटना घडली. विमान कंपन्यांनी विमानाचे भाडे चार पटीने वाढवली. अहो तुमच्या देशातील जनता त्रासात आहे. तुम्ही त्यांच्या मड्यावरील लोणी खाण्यापेक्षा त्यांची मदत करायला हवी होती. यानंतर सरकारने विमान कंपन्यांना विनंती केली तेंव्हा रद्द केलेल्या तिकिटावरील शुल्क रद्द केला, इतर काही शुल्क रद्द केले. परंतू भाड्याचा वाढविलेला दर मात्र विमान कंपन्यांनी कमी केला नाही. आज कश्मिर बंद आहे. कश्मिरच्या लाल चौकामध्ये प्रदर्शन होत आहे. काश्मिरच्या मस्जिदींमधून घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. एवढी मोठी घटना झाल्यानंतर पंतप्रधानांनी दुबई दौरा रद्द केला ते परत आले आहेत. पुलवामा हल्ला होवून सहा वर्ष झाले. आज पर्यंत त्यांचा अंतिम निर्णय आलेला नाही. पहेलगाम म्हणजे पुलवामा-2 आहे आहे काय? असा प्रश्न पत्रकार अशोक वानखेडे यांनी उपस्थित केला आहे. पण ते सांगतात. पुर्वी झालेल्या हल्यानंतर राजीनामे घेतले जायचे. पण आजच्या परिस्थितीत दहशतवादाचे स्वरुप सुध्दा बदलले आहे. म्हणून नैतिकतेला जागाच नाही. दीड वर्षापुर्वी अमरनाथ यात्रेच्या पार्श्र्वभूमीवर सैन्याकडे असलेले काम काढून घेण्यात आले. आजही अमरनाथ यात्रा सुरू व्हायची आहे. अशा परिस्थितीत पहलगाम हल्ला झाला, करायला लावला की होवू दिला? हे तिन प्रश्न पुलवामा हल्याच्या वेळी काश्मिरचे तत्कालीन राज्यपाल मल्लीक यांनी पण विचारले होते. या हल्यातील प्रत्येक व्यक्तीच्या मृत्यूची जबाबदारी ही शासनावर आहे. धर्म विचारला हे लिहितांना थोडी सुध्दा लाच कोणाला वाटत नाही काय? भारतात धर्म पाहुनच बुलडोजर चालविले गेले, उत्तर प्रदेशमध्ये तर धर्म विचारूनच बालिका आणि युवतींना उचलून नेले जाते आणि तुम्ही धर्माबद्दल बोलता किती दुर्देव आहे ना.
खा.निशिकांत दुबे नव्याने असे सांगतात संविधानातील परिच्छेद 25 ते 29 पुर्णपणे समाप्त केले पाहिजे. या सर्वांमध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे. अहो अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी सण साजरा होतो. कारण त्यांच्या संविधानात सुध्दा धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि तुम्ही म्हणता 25 ते 29 हे संविधानाचे परिच्छेद पुर्णपणे बदलायला हवे. यावर अशोक वानखेडे सांगतात. ठाण्यामध्ये दोन साधूंची हत्या झाली होती. तेंव्हा देशभराने उध्दव ठाकरेंचा राजीनामा मागितला होता. आता कोणाचा राजीनामा मागयचा आणि त्या व्यक्तीकडून कसा राजीनामा मागणार ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डचा डाका टाकला. सर्वोच्च न्यायालयाला धमक्या दिल्या. रुपयाचा दर पडत असतांना आनंद साजरा केला. म्हणूनच पाली भाषेतील शब्दाप्रमाणे अदीन्न दाणा वेरमणी सिख्खा पद्म समादयामी. या अर्थ असा आहे की, ज्या गोष्टींवर माझा अधिकार नाही ती मला तुमच्याकडून मागता येणार नाही. या बद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पट्टे बापूराव यांनी मिलिंद कॉलेज तयार करतांना हेच पाली भाषेतील शब्द वापरून त्यांची आर्थिक मदत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली होती. निशिकांत दुबेसारखे लोक शब्द बोलतात पण परंतू त्याचे स्क्रिप्ट इतर कोणी तरी तयार करत असते आणि अशा शब्दातून ते लोकांना भिती दाखवतात. विशेष करून आजच्या परिस्थितीत मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांना जी धमकी दाखवली जात आहे. ती त्यांच्या पेक्षा जास्त येणाऱ्या सरन्यायाधीश भुषण गवईंना दाखवली जात आहे. पण आमचा विश्र्वास आहे की भूषण गवई या सर्व धमक्यांचे परिपुर्ण उत्तर देतील. अतिरेक्यांनी ओळख पटवून हत्या केल्या हा त्यांचा उद्देशच होता. त्या उद्देशात भारतीय जनता पार्टीच्यावतीने वेगवेगळ्या पध्दतीने तेल टाकण्याचा सुरू असलेला प्रकार मनविच्छीन्न करणारा आहे.
Leave a Reply