आदरणीय पवार साहेब यांचे राजकीय खेळी बद्द्ल आमचे आमदार अजित दादा यांनी काही नकारात्मक उद्गार काढले होते. त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर आदरणीय पवार साहेब यांनी उत्तर न देता अजित पवार यांचे बद्दल ‘बालक बुद्धी’ अशा अर्थाचे विधान केल्याचे युट्युब वर ऐकले. अजित दादा हे खरोखर बालक बुद्धीचे आहेत असे पवार साहेबांचे मत कधी बनले हे समजायला मार्ग नाही. 2014 मध्ये मी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली होती. अनेकांनी माझी टवाळी केली होती हेही खरे आहे. माझा हेतू साफ होता. आपण राजकारणावर टीका करतो पण ते बदलण्याबद्दल काहीच करत नाही. शेती बदलायची असेल तर शेतात उतरावं लागतं. बांधावर उभे राहून ते होत नाही. तसंच राजकारणाचं. निवडणुकीच्या काळात मी एक 40 पानी छोटी पुस्तिका छापून त्याच्या हजारो प्रति बारामती मतदारसंघातील काही मतदारापर्यंत पोहोचविलेल्या होत्या. त्यात मी आदरणीय पवार साहेब यांचे प्रचंड कौतुक आणि ऋण मानत मोठेपण मांडले होते . सुप्रिया ताई यांचे बद्दल देखील सगळेच गौरव उद्गार काढले होते. आजची राजकीय मॉडेल्स कालबाह्य झालेली आहेत त्याऐवजी कोणती मॉडेल्स असायला पाहिजेत याबद्दल मी केलेल्या प्रयोगावर आधारित ‘अठरा पगड मावळे शिवशाही’ अशा मथळ्याचे मॉडेल मी जनतेपुढे मांडले होते. मला निवडून दिले तर मी हे मॉडेल बारामती मतदार संघामध्ये राबवून नक्कीच वेगळा बदल करून दाखवीन अशा आशयाचा निवडणुकीचा जाहीरनामा म्हणून जाहीर केला होता. फक्त अजितदादा व त्यांची कार्यपद्धती यातील दोष दाखविले होते. महाविद्यालयीन शिक्षण नाही. कोणतीही ठोस विचारसरणी नाही. राज्यघटना कायदे यांचा अभ्यास नाही. साहित्य, कला ,संगीत यासारख्या गोष्टींचा संबंध नाही. कार्यकर्ता व इतरांशी अरेरावीत संवाद. शेती, कोंबडी पालन, घासलेट ची एजन्सी या व्यतिरिक्त अनुभव नाही. सुमारे 18 लाख जनतेचा प्रतिनिधी बनविलेला खासदार स्वतःला टग्या म्हणवून घेऊ लागला. अनेकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद दिले. घराणे शाहीतून असे नेतृत्व उभे केल्याने लोकशाही प्रगल्भ होणार नाही. पेशवाई पुन्हा येऊन राज्यघटना हतबल होईल अशी मांडणी मी त्या पुस्तिकेत केली होती. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक असताना मला तरी अजित दादा यांची कार्यपद्धती ही
‘प्रौढ पणाची’ जाणवली नव्हती.
आमच्या उमेदवाराला मतदान केले नाही तर मासाळवाडीतील गावकऱ्यांना पाणी बंद करण्याची धमकी दिली होती. त्याबद्दल मी खाजगी तक्रार दाखल केली. आज त्यांच्याविरुद्ध बोलणारे त्यांच्या समर्थनासाठी पुढे आलेले होते. प्रथमदर्शनी त्या तक्रारीत तथ्य आहे असे म्हणून बारामती कोर्टाने अजित पवार यांना आरोपी ठरवून हजर राहण्यासाठी नुकतेच समन्स बजावले आहे.
पवार साहेबाकडून अजित दादा सारख्या ‘बाल बुद्धीला’ पुढे का आणले गेले असावे? वेळीच बाजूला का केले गेले नाही याचा राजकीय, समाजशास्त्रीय, मानव वंश शास्त्रीय, आर्थिक,….,बाजूने विचार केला गेला पाहिजे.
पवार साहेबांचे मूळ कुटुंब शेतकरी.कृषी प्रधान.शेती वर जगायचे म्हटले की कुटुंबातील सगळ्यांना राबावे लागते. त्यातून एकत्र कुटुंब पद्धती ही आवश्यक ठरते. शेतीचे व्यवस्थापन गाव गाडा पद्धतीने चाले. एकत्र कुटुंबातील प्रत्येकाशी भावनिक नाते निर्माण होते. कुटुंबातील कर्तुत्ववान, महत्त्वकांक्षी, करिष्मा युक्त, तरुण पुढे येतो. कुटुंबाचा कारभारी बनतो. तो प्रत्येक सभासदाच्या भल्याचा विचार करतो. त्यातून कृषी संस्कृतीची अशी एक नीतिमत्ता morality निर्माण होते. कुटुंब असेच भरभराटीला यावे. गाव गाड्यात आपले वजन, प्रतिष्ठा, नाव राहावे यासाठी आपला उत्तराधिकारी निवडतो. शेती संस्कृतीतून काही करिष्मायुक्त तरुण राजकारणात आले. राजकारणावर देखील कृषी संस्कृती नीतिमत्तेचा प्रभाव पडून कुटुंबातून आपले उत्तराधिकारी निवडले जाऊ लागले. त्यातूनच महाराष्ट्रात शेती व्यवसायातील अनेक मोठ्या कुटुंबामध्ये घराणे शाहीने मूळ धरले असे वाटते.
याच कृषी संस्कृती नीतिमत्तेमधून अजितदादांचे नशीब फळफळले. यात समाजाला फारसे वागवे वाटत नाही. कुलकर्णी चा मुलगा कुलकर्णी आणि पाटलाचा मुलगा पाटील हे शेकडो वर्ष चालू असल्याने लोकशाही प्रक्रिया मागे पडली व पवार घराण्यातून छोटा पवार पुढे आला.
इतरांकडे बोट दाखवण्यात अर्थ नाही. मी देखील या बालक बुद्धीचा बळी आहे. कुटुंबातील एका दुबळ्या, नेभळट भावाला शिकवून वकील केले. लग्न लावून दिले. कमवत नसल्याने सासरा म्हणाला “तुमच्या घराण्याकडे पाहून त्याला मुलगी दिली. तो आता बोंबलत फिरतोय. त्याचं काय करताय?” मग खटपटी करून सरकारी नोकरी लावली. मुलींची लग्न जमवण्यासाठी पुढाकार घेतला. या भावांना त्यांच्या मुलांना शिक्षण, त्यांचे संसार उभे करने ,नोकरीत संरक्षण देणं यासाठी
मदत केली. त्यांना एवढीच विनंती केली होती की आपली वडीलोपार्जित जमीन आपण भाऊ व बहिणी यांचे मध्ये समसमान वाटून घेऊ. आपल्या आई-वडिलांनी सर्वांना ग्रॅज्युएट बनवून एक पंचक्रोशीत उदाहरण घालून दिले तसेच आलेल्या कायद्यानुसार आपण मुला मुलींमध्ये समान वाटा घेऊन एक उदाहरण घालून देऊ. पण हे भाऊ बालक बुद्धीचे निघाले. वाटा द्यायचे तर सोडाच पण सख्ख्या बहिणींना कोर्टातून वारस पत्र मिळू नये यासाठी यांनी आपली वकिली डिग्री पनाला लावली.
अशा गोष्ट जाहीर लिहून तुम्ही घराण्याची व तुमची अब्रू चव्हाट्यावर का आणता? असे अनेक जण विचारतात. ते खरं आहे. पण हेही खरं आहे की हे कृषी संस्कृतीतील नीतीमत्तेचं सार्वत्रिक उदाहरण आहे. घरोघरी तेच चालू आहे. मी जाहीरपणे लिहितो कारण मी सच्चा परिवर्तनवादी असून माझा हेतू साफ आहे! पूर्वी मुलींच्या शिक्षणाला विरोध होता आता बहिणींना वाटा देणे याबद्दल नातेवाईक व मित्र यांचा केव्हडा मोठा विरोध आहे याची प्रचिती आली. पण मी रणांगण सोडले नाही. कोणता भाऊ वर जाताना वडिलोपार्जित जमीन बरोबर घेऊन जाणार आहे?
पवार साहेबांनी बालक बुद्धीला वाव दिल्याने महाराष्ट्राचे व समाज व्यवस्थेचे काय फायदे आणि काय तोटे झाले? फुले शाहू आंबेडकर हे विचारवंत व यशवंतराव चव्हाण सारखे राजकारणी यांचे विचार बाजूला फेकले गेले. प्रभावहीन झाले. अनेक वर्ष मेहनतीने उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचे चिन्ह जाहीरपणे हिरावून घेतले.कुटुंबातील दुबळी आणि नेभळट पोरे फार क्रूर व कृतघ्न असतात. उपकार करनारा त्यांच्या दृष्टीने सॉफ्ट टारगेट असतो. शाहू फुले आंबेडकर,…., यांचे तत्त्वज्ञान सांगत मोठ्या मेहनतीने तयार केलेले नेते ब्राह्मणी श्रेष्ठत्व व शोषण याचे समर्थन करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या पालखीला जुंपले गेले!
कुटुंबातील दुबळ्या नेभळट पोरांना पुढे आणण्या ऐवजी खऱ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, प्रशासकीय,…., भान असलेल्या सक्षम तरुणांना बळ देता आले असते का? स्वतःच्या कुटुंबा ऐवजी समाजातील इतरांना पुढे आणण्यासाठी मदत केल्याचे उदाहरण इतिहासात कुठे घडलेले आहे का? हो घडलेले आहे! स्वतःच्या पोरापेक्षा दुसरा मुलगा सक्षम आहे म्हणून आपल्या मुलाच्या ऐवजी त्या सक्षम मुलाला परदेश शिक्षणासाठी पाठविणारे गांधीजी माहित आहेत. भांडीकुंडी ईका पर लेकराले शिकवा सांगणाऱ्या बाबाच कीर्तन ऐकून माझ्या आईने आम्हा भावांना शिकवले. किर्तन चालू असता आपला मुलगा मेल्याची माहिती मिळाल्यावर हजारो लोकापुढील चालू असलेले कीर्तन बंद न ठेवणाऱ्या त्याच गाडगेबाबा बद्दल मी ऐकलेले आहे. मला मात्र इतर योग्य उमेदवारा ऐवजी माझ्या कुटुंबातील व्यक्ती महत्त्वाच्या वाटल्या. बालक बुद्धीला पाठबळ दिले. सन्माननीय शरद पवार सारखे राष्ट्रीय पातळीवरील नेते कुटुंबातील या बालकबुद्धी सदस्यांच्या पुढे हतबल झाले व आपल्या राजकीय कर्तृत्वावर धोंडा पाडून घेतला. शेती संस्कृतीचा प्रभाव असलेल्या आम्हा बारामतीकरांना नागपूर येथे शिजत असलेल्या कपटी बामनांचा कावा समजलाच नाही. भाजीपाला, अंडी, घासलेट विकून ब्राह्मणाची कुटुंबे पोट भरत नाहीत. कृषी संस्कृती ची नीतिमत्ता त्यांच्या मनावर बिंबलेली नाहीत. औद्योगिक संस्कृतीची नीतिमूल्य त्यांना माहीत. कुटुंब ऐवजी व्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचे. माझा बाब्या, माझी बबडी म्हातारपणी प्रतिष्ठा मिळवून देईल, सांभाळील यावर त्यांचा विश्वास नाही. कृषी संस्कृती नीतिमत्तेचा फोलपणा बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या लक्षात आला म्हणून गेले अनेक वर्ष मी त्यावर जाहीर लिहीत आणि बोलत असतो.
माझा जीव, क्षमता,पोच, अभ्यास, अनुभव,…., हा खूप छोटा आणि मर्यादित आहे याची मला कल्पना आहे. तरीपण सर्वच क्षेत्रातील आणि विशेषता राजकारणातील कृषी संस्कृती नीतिमत्ता विचार व कार्यपद्धती कालबाह्य झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर सर्वच पक्षांमध्ये बालकबद्धीचा सुळसुळाट झालेला आहे. किती खायचे किती कमवायचे याचे भान या बालकांना न राहिल्याने परशुरामाच्या पुरस्कर्त्याने यांचे विरुद्ध ईडीसीबीआय अँटी करप्शन यांचे जाळे टाकले व आपल्या रथाला जुंपले. ते व त्यांचे पक्ष नामशेष होत आहेत.
त्यावर उपाय म्हणून ‘ अठरा पगड मावळे शिवशाही’ या मॉडेलची शिफारस केलेली आहे. यामुळे निव्वळ बारामतीतीलच नव्हे तर देशभरातील ‘ बालकांवर’ चाप बसेल अशी खात्री आहे.
_सुरेश खोपडे
Leave a Reply