होम डिपार्टमेंटचे प्रमुख आदरणीय देवेंद्रजी फडणवीस व आदरणीय रश्मीजी शुक्ला यांच्या ऐवजी अनुक्रमे निव्वळ देवाभाऊ व रश्मी आक्का असे म्हटल्याने त्यांचे कर्म बदलणार आहे का?
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत साहेब यांची सचोटी प्रामाणिकपणा उच्च दर्जाचा आहे. ते ज्या धडाडीने बीडमध्ये काम करतात त्याबद्दल त्यांचे जाहीर कौतुक! त्यांनी एक फतवा काढला. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या नेमप्लेट वर फक्त पहिले नाव लिहायचे. आडनाव लिहायचे नाही. त्यामुळे पोलिसांची जात कळणार नाही व होणारा जातीयवाद थांबेल.अनेक गुन्हेगारांना बोलावून चौकशी केली त्यावेळेला त्यांना समजले की जातीयवाद हा बीड मधील गुन्हेगारी मागील महत्त्वाचा प्रश्न आहे.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना व आपल्या समाजात राहताना त्यांना हे माहीत असलेच पाहिजे की गेले शेकडो वर्ष वर्णव्यवस्था व जात व्यवस्था यावरून एकमेकांना संपवण्याचे व शोषण करण्याचे कार्य चालू आहे. तरीपण एका जिल्ह्यातील आडनाव लिहायचे बंद केले तर जातीयवाद कितपत संपेल?
पोलीस स्टेशन मधील कर्मचारी व अधिकारी यांना एकाच प्रकारचा खाकी युनिफॉर्म बॅज असला तरी हे सगळे जाती, पोट जाती व धर्मात कधी उघडपणे बऱ्याचदा सुप्तपणे /अबोध मनात विभागलेले असतात . त्यांचे गट पडलेले असतात. महाराष्ट्रातील आयपीएस मध्ये देखील जात, धर्म, प्रांत, विचारसरणी यावरून लॉबी बनलेल्या आहेत. पोलीस स्टेशनला जाणारी जनता ही येनकेन प्रकारे तो अधिकारी अगर कर्मचारी याची जात शोधते.आडनाव लपविल्याने जात लपविली जाईल व पोलीस कर्मचारी जात निरपेक्ष काम करतील ही पोलिस अधीक्षक बीड यांची भाबडी आशा आहे.
माणसाची जात, धर्म, वर्ण, परिसर, प्रांत देश इत्यादी बाबी कामगारात गट, तट निर्माण करतात. ते मतभेद बाजूला सारून त्यांची एक चांगली टीम/ संघ बनवून प्रशासनाची परिणामकारकता व प्रभावीपणा वाढवण्याचे अनेक प्रयोग विशेषतः कार्पोरेट जगात झालेले आहेत.त्या शास्त्रांचा अभ्यास करून मी पोलीस दलामध्ये ‘काम सुधार मंडळ’ work improvement committee ही योजना यशस्वीपणे राबविली होती.
पोलीस स्टेशन मधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिपाई ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे नियमितपणे एकत्र येत. विचारांची देवाणघेवाण करीत. चांगल्या कल्पना सुचवित. पोलीस स्टेशनचे दैनंदिन व दीर्घकालीन कामकाज प्रभावीपणे आणि परिणामकारकपणे करण्यासाठी एकत्र जमलेल्या गटास काम सुधार मंडळ असे नाव दिले होते. काम सुधार मंडळ मी भिवंडी, पुणे ग्रामीण, सातारा, धुळे, अकोला अमरावती एस आर पी एफ,नांदेड, मुंबई रेल्वे व मुंबई शहर पोलीस स्टेशन मध्ये यशस्वीपणे राबविली होती. वीस पंचवीस वर्षांपूर्वी माझ्याबरोबर काम केलेले काही कर्मचारी आजही मला भेटल्याबरोबर ही व्याख्या तोंडपाठ म्हणून दाखवतात. मोठ्याने हसतात आणि पोलीस पद्धतीने शालूट करतात. ही योजना भारतातील एकत्र कुटुंब पद्धती, जपान मधील ‘काय झेन’ (काय म्हणजे बदल व झेन म्हणजे चांगला). कामकाजात चांगला बदल करणे. सिक्स सिग्मा. ‘क्वालिटी सर्कल’. क्वालिटी सर्कल म्हणजे कार्यालयातील सगळ्या थरातील लोक नियमित एकत्र येतात. चांगल्या कल्पना सुचवितात.नवीन मार्ग शोधतात. नाविन्यपूर्ण प्रयोग करतात व मालाचे उत्पादन जास्त झाले पाहिजे व त्याचा दर्जाही चांगला राहिला पाहिजे यासाठी काम करणारा कर्मचाऱ्यांचा गट म्हणजे क्वालिटी सर्कल होय. या व अशा अनेक नाविन्यपूर्ण योजनांचे एकत्रीकरण करून केलेला तो प्रयोग होता. प्रत्येक कार्यालय व पोलीस स्टेशनमध्ये महिन्यातून एक सहभोजन होत असे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि पोलीस अधिकारी एका पंक्तीला जेवत. सत्यशील शिंदे नावाच्या एका कार्यकर्त्याच्या घरी गेलो असता त्याच्या वडिलांनी फलटण पोलीस स्टेशनला आम्ही एकत्रित एका पंक्तीत जेवत असल्याचा फोटो दाखविला. ते त्यावेळी पोलीस स्टेशनला हेड कॉन्स्टेबल म्हणून नेमणुकीस होते.
पोलीस कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची व्यक्तिगत वाढ व व्यावसायिक वाढ करण्याचे असंख्य कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविले होते. पोलीस दलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व प्रशासकीय कार्यालयात ही योजना राबवता येऊ शकते. तत्कालीन सरकारने ही योजना अजिबात विचारात घेतली नाही.
पोलीस ट्रेनिंग मध्ये त्यांचा निम्मा वेळ कायद्याच्या कलमांची घोकम पट्टी करण्यात जातो. व निम्मा वेळ तेज चाल, दहिने मूड, बाये मूड, सामने शालुट करण्यात जातो. त्यामुळे त्यांचे मांडीचे व दंडाचे स्नायू बळकट होतात. काळजाचे स्नायू जिथे प्रेम, करुणा, सेवा असते त्याची मशागत केली जात नाही. मेंदूतील स्नायू जे नाविन्यपूर्ण विचार करतात, जातीय विचाराने बळकट झालेले असतात ते तसेच राहतात. त्यांना सुधारण्याचा व्यायामच दिला जात नाही. बाहेर पडल्यावर ते पुन्हा खाकी युनिफॉर्म घातलेले सत्ता व अधिकार मिळालेले रोबो बनतात. आणि मग ते रेशीम बागेत ट्रेन झालेल्या, राखी बहीण म्हणून खास नेमलेल्या रश्मी अक्का सारख्या पोलीस प्रमुखाच्या इशाऱ्यावर जातीयवाद पोसतात.
बीडचे पोलीस अधीक्षक हे राजस्थान मध्ये वाढलेले व महाराष्ट्र एकूण नोकरी आठ वर्ष झालेले तरुण आहेत. असे तरुण लोक खूप साधा आणि सोपा मार्ग शोधतात.
आपले आडनाव दडवून ठेवले तरी देवा भाऊ व रश्मी अक्का यांना मूलभूत काम करायचे नाही. तात्पुरती मलमपट्टी करायची य. राज्यघटना नव्हे तर रेशीम बागेची घटना अमलात आणायची असल्याने या अशा योजनांचे मोठे कौतुक होईल यात शंका नाही.
_सुरेश खोपडे.
Leave a Reply