Advertisement

विभागीय आयुक्तांचा ‘संवाद मराठवाड्याशी’ लाभार्थ्यांशी साधला थेट संवाद ; प्रभाग व ग्रामसंघाला जागा उपलब्ध करणार

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग 

नांदेड  – मराठवाडा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज ‘संवाद मराठवाड्याशी’ या उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे लाभार्थी महिला, स्वयंसहायता गट, ग्रामसंघ आणि स्थानिक नागरिकांशी ऑनलाईन थेट संवाद साधला. या संवाद मराठवाड्याशी उपक्रमात मराठवाड्यातील महिलांनी भरभरुन प्रतिसाद दिला व आपल्या शंका व अडचणी विभागीय आयुक्तासमोर नि:संकोचपणे मांडल्या.

दुपारी 4 ते 6 या वेळेत पार पडलेल्या या संवादात विभागीय उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे, उपायुक्त सुरेश बेदमुथा तसेच मराठवाड्यातून सर्व निवासी उपजिल्हाधिकारी, प्रकल्प संचालक, तहसिलदार आदीं उपस्थित होते. तर नांदेड येथून निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, डिआरडीएचे गजानन पातावार, एनआयसीचे प्रदीप डुमणे इ. संबंधित अधिकारी उपस्थित होते.

लाभार्थ्यांनी विविध योजना, त्यांची अंमलबजावणी, निधी वितरण, प्रशिक्षण आणि कार्यान्वयानातील अडचणी, तसेच प्रभागसंघ व ग्रामसंघ कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन मिळावी, अशी मागणी अनेक बचतगटामार्फत करण्यात आली. या संवाद माध्यमातून महिलांच्यावतीने मांडलेला प्रत्येक मुद्द्या विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी ऐकूण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या सर्व अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे विषय सोडविण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी यांची नियुक्ती करण्याबाबत सूचना दिल्या.

राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून आज मराठवाड्यातील जवळपास 6 हजार महिला जोडल्या गेल्या होत्या. ज्या लोकांना जिल्हा पातळीवर न्याय मिळत नाही. त्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. ग्रामीण भागात महिलांचे आर्थिक सशक्तीकरण, बचतगटांचे संघटन, व उद्यमशीलतेला चालना देणे हे उद्दिष्ट असल्याचे सांगत, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी बचत गटाच्या महिलांनी ज्या उत्पादनाला बाजारात मागणी आहे, असे उत्पादन तयार करण्यावर भर द्यावा, असे आवाहन या संवादाच्या माध्यमातून केले.

नांदेड जिल्हृयातील माहूर तालुक्यातील दोन बचतगटाच्या महिलांनी या उपक्रमात संवाद साधला. माहूर तालुक्यातील एका बचतगटाने ग्रामसंघाचे कर्ज प्रस्ताव नामंजूर असल्याची समस्या मांडली तर माहूर तालुक्यातील लखमापूरच्या बचतगटाच्या अध्यक्ष महिलेने प्रभाग व ग्रामसंघाला कार्यालय मिळावे अशी मागणी केली. मराठवाड्यातील सर्व महिलांनी आज सुरु झालेल्या ‘संवाद मराठवाड्याशी’ या उपक्रमाचे स्वागत करत, अशा संवादामुळे थेट प्रशासनाशी जोडले जात असल्याबाबत समाधान व्यक्त केले.

प्रत्येक बुधवारी वेगवेगळ्या विषयावर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार असून, पुढील आठवड्यात नवीन विषयावर संवाद साधला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?