मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील रोहिणा गावात एका पोलिसाचा ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. त्यामुळे हे गाव देशपातळीवर वेगळ्या कारणाने प्रकाशझोतात आले आहे. मीरा भाईंदर, मुंबई येथे पोलीस असलेल्या मूळच्या मराठवाड्यातील रोहिणा येथील प्रमोद केंद्रे याचा हा ड्रग्स बनविण्याचा कारखाना नुकताच उध्वस्त करण्यात आला त्यानंतर मराठवाड्यात प्रचंड खळबळ उडाली. महसूल गुप्तचर संचालनालयाने अर्थात डी आर आय च्या मुंबई,पुणे,नागपूर येथील 35 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक या कारखान्याच्या शोधासाठी लातूर,चाकूर व रोहिणा येथे सात दिवसांपासून तळ ठोकून होते.
चाकूर तालुक्यातील रोहिणा गावापासून चार किलोमीटरवर शेतात एक पत्र्याचे शेड होते. त्या ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्थित रस्तादेखील नाही. मुंबई,पुणे व नागपूरच्या डी आर आय च्या पथकाने भल्या पहाटे त्या शेडवर छापा टाकला. त्या ठिकाणी 11 किलो छत्तीस ग्रॅम मेफेड्रोन (एम. डी.) हा अमली पदार्थ जप्त केला. बाजारात या ड्रग्सची किंमत 17 कोटी रुपये असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. मीरा-भाईंदर मुंबई येथे डीबी पथकात असलेला प्रमोद केंद्रे हा ड्रग्स बनविण्याचे साहित्य मुंबईवरून घेऊन गावाकडे येत होता. गावातील शेतात त्याने ड्रग्स बनविण्याच्या साहित्यासह मुंबई येथून दोघांना आणले होते.ते दोघेही पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्स तयार करून देत असत त्यानंतर केंद्रे ते ड्रग्स मुंबईला व इतर ठिकाणी घेऊन जात होता. पोलीस असलेल्या प्रमोद केंद्रे यांनी स्वतःच्या कारमध्ये ड्रग्स बनविण्याचा कच्चामाल आणला होता. ती माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळाल्यानंतर त्यांचे पथक सात दिवसापासून रोहिणा या गावात तळ ठोकून होते.
त्या छाप्यात ११ किलो ३६० मि मेफेड्रोन (८ किलो ४४० ग्रॅम कोरडे आणि २ किलो ९२१ ग्रॅम द्रव स्वरूपात) जप्त करण्यात आले. मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि प्रयोगशाळेतील उपकरणेही सापडली. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. या कारवाईत मेफेड्रोन निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. छापा टाकलेल्या पथकाकडून या प्रकरणात जलद कारवाई करून मुंबईतून या टोळीचा वितरक आणि आर्थिक पुरवठादार यांनाही अटक करण्यात आली. आरोपीची कामे वाटून देण्यात आली होती. काही जण निर्मिती, तर काही जण वितरण व पैशांचे व्यवहार पाहत होते. अटक केलेल्या आरोपींनी ड्रग्जचे वितरण कोठे केले आहे. तसेच कच्चा माल कुठून मिळवला, ड्रग्स बनवण्याचे तंत्र कोणाकडून शिकले याबाबत चौकशी सुरु आहे. सात जणांना अटक करून बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
आरोपींमध्ये प्रमोद संजीव केंद्रे (वय ३५ रा. रोहिणा ता. चाकूर), महमद कलीम शेख (रा. गोळीबार रोड, मुंबई), अहमद अस्लम खान (रा. मुंबई) जुबेर हसन मापकर (५२ रा. रोहा जि. रायगड), आहाद मेमन (रा. डोगरी, मुंबई), यांचा समावेश आहे. एका कारमध्ये आरोपी आहाद अल्ताब खान ऊर्फ आहद शफीक मेमन (२८, रा. डोगरी ता. जि. मुंबई) होता. त्याला कलम ६४ एनडीपीसी अॅक्ट १९८५ अन्वये कारवाईसाठी पथकासोबत कारमधून घेऊन जात असताना त्याने कारची स्टेरिग अचानकपणे उलटी फिरवून जाणीवपूर्वक दुखापत पोहोचून जीवे मारण्याच्या उद्देशाने कार उलट्या दिशेने वळवली. त्यामुळे ती कार एका हॉटेलच्या बोर्डाला धडकावली. यात कारचे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून, कारमधील अधिकारी-कर्मचारी किरकोळ जखमी झाले. समोर उभी असलेल्या एका दुचाकीला त्या कारची धडक बसली. या प्रकरणी चाकूर पोलिसात वृंदा जयंत सिन्हा यांनी फिर्याद दिली. त्यावरून आहाद मेमनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातामुळे या घटनेचा उलगडा झाला.
तुळजापूर मंदिरातील पुजारी…..
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मंदिरापर्यंत पोहोचल्याचा दावा केला जात आहे. जवळपास १२ ते १३ पुजारी सेवनात गुंतले असून, त्यांना चौकशीसाठी नोटिसा देण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मात्र, पुजारी मंडळांनी संतप्त भावना व्यक्त करीत हा समस्त पुजाऱ्यांच्या बदनामीचा प्रकार असल्याची भूमिका मांडली आहे. यावरून आता तुळजापूर वादविवादाचा आखाडा बनला आहे.तुळजापूर, तामलवाडी येथील ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ३५ आरोपी निश्चित केले आहेत. यापैकी १४ आरोपी कोठडीत आहेत, तर २१ आरोपी फरार आहेत. या फरारींमध्ये माजी नगराध्यक्ष, नगरसेवकाचाही समावेश आहे. एकीकडे या फरारींचा शोध घेत असतानाच पोलिसांनी आरोपींशी सातत्याने असलेला संपर्क, आर्थिक व्यवहार केलेल्या अनेकांना संशयावरून चौकशीच्या नोटिसा दिल्या आहेत.
नोटीस दिलेल्यांमध्ये सुमारे १२ ते १३ जण मंदिरातील पुजारी असल्याची चर्चा तुळजापुरात आहे. या चर्चा सुरू होताच मंदिरातील पुजारी मंडळांनी एकत्र येत, हा पुजाऱ्यांच्या बदनामीचा कुटिल डाव असल्याचा आरोप केला आहे.
जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार म्हणाले की, मंदिरातील कोणी यात सहभागी असेल व दोषी सिद्ध झाले तर विश्वस्त बैठकीत हा विषय मांडून कार्यवाहीचा विचार केला जाईल. दोष सिद्ध होण्यापूर्वी कार्यवाहीची घाई केली जाणार नाही.
ड्रग्ज प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पुजारी मंडळांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यामध्ये दोषी असलेल्या प्रत्येकावर कायद्याने कारवाई जरूर करावी. मात्र, त्याआडून समस्त पुजाऱ्यांच्या बदनामीचा कुटिल डाव खेळू नये, अशी प्रतिक्रिया पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर कदम, प्रक्षाळ पुजारी मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांनी माध्यमांकडे व्यक्त केली.
या प्रकरणाचा तपास सुरुवातीपासूनच पोलीस करत आहेत.आरोपी कोण आहेत, कोणाशी संबंधित आहेत, हे न पाहता पारदर्शकपणे करीत आहोत.
ज्यांच्याविषयी सबळ पुरावे आढळले आहेत, त्यांच्यावर कारवाई करीत आहोत. मग ते पुजारी आहेत, नागरिक आहेत की अन्य कोणी, यावर आमचा फोकस नसल्याचे पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले.
मराठवाडा अगोदरच वेगवेगळ्या कारणांवरून बदनाम झालेला असतानाच पुन्हा एकदा ड्रग्सच्या कारखान्यावरून मराठवाडा चर्चेत आला आहे. या प्रकरणात पुढे खूप मोठी कडी जोडली जाईल, अशी अपेक्षा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत.
डॉ. अभयकुमार दांडगे,
मराठवाडा वार्तापत्र
12 एप्रिल 2025
Leave a Reply