नांदेड(प्रतिनिधी)-उपअधिक्षक भुमि अभिलेख कार्यालयात बनावटपणे तयार झालेल्या एका गुन्ह्यानंतर अनेकांनी भुमि अभिलेख कार्यालयात चिरीमिरीशिवाय आणि दलालीशिवाय काम होत नाही अशा आशयाच्या तक्रारी सुध्दा केलेल्या आहेत.
दि.5 एप्रिल रोजी पोलीस ठाणे वजिराबाद येथे गणेशसिंह गुलाबसिंह ठाकूर यांनी तक्रार दिली की, शिवकरणसिंह नरसिंहसिंह ठाकूर, गोपालसिंह माधवसिंह ठाकूर आणि इतरांनी मिळून माझ्या मातोश्री स्व.कलावतीबाई गुलाबसिंह ठाकूर यांच्या नावाचे बनावट मृत्यू पत्र तयार करून आमच्या मालकीच्या संपत्तीवर कब्जा करून ती विक्री करण्याचा प्रयत्न केला. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या हद्दीतील पिरबुऱ्हाननगर येथे शेत सर्व्हे क्रमांक 57/अ, सिटी सर्व्हे क्रमांक 56 पैकी भुखंड क्रमांक 8 ज्याची लांबी 100 फुट आणि रुंदी 59 फुट आहे असा 5 हजार 900 चौरस फुटाचा भुखंड खरेदी खत क्रमांक 3136/1978 प्रमाणे खरेदी केला आहे. माझ्या आईचा मृत्यू सन 2016 मध्ये झाला आणि वडिलांचा मृत्यू सन 2022 मध्ये झाला. माझ्या आई-वडीलांचे वारसदार मी , माझा भाऊ दिनेशसिंह आणि लग्न झालेल्या बहिणी कल्पना आणि बबीता आहेत. माझ्या आई-वडीलांनी जीवंतपणी कोणताही दस्त कोणाच्याही अधिकारात करून दिलेला नाही. शिवकरणसिंह याने आमच्या आई-वडीलांचा दत्तक पुत्र दाखवून चुकीच्या तारखेचे मृत्यू प्रमाणपत्र न्यायालयाची दिशाभुल करून हस्तगत केले. भुमिअभिलेख कार्यालयात सुध्दा या प्रकरणातील आरोपींनी बेकायदेशीर पणे फेरफार करून घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्हाला सांगण्यात आले की, वारसा हक्क प्रमाणपत्राप्रमाणे हा फेरफार झाला आहे. त्यानंतर आम्ही न्यायालयातून सर्व कागदपत्र घेतली. त्यानुसार आमची मालमत्ता हडपण्यासाठी हा फसवणूक प्रकार झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर आम्ही तक्रार दिली आहे. वजिराबाद पोलीसांनी या तक्रारीवरुन भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 336(2), 336(3), 338, 340(2), 3(5) प्रमाणे गुन्हा क्रमांक 144/2025 दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सरदार जगदीपसिंघ नंबरदार आणि संजय वानखेडे यांनी भुमी अभिलेख कार्यालयात दलालांमार्फत कामकाज होते, चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणाचेच काम केले जात नाही आणि बनावट पध्दतीने कागदपत्र तयार होता अशा आशयाचे अर्ज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना सादर केले आहेत.
बनावट मृत्यूपत्राच्या आधारावर संपत्तीचा फेरफार करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

Leave a Reply