मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव आज नांदेड शहरात अत्यंत उत्साहात पार पडला . कोणतेही गालबोट न लागता शांततेत आणि उत्साहात पार पडलेल्या रामजन्मोत्सवाचे श्रेय पोलीस प्रशासनालाही द्यावे लागेल. माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली शहरात तगडा बंदोबस्त ठेवून काढण्यात आलेली रामनवमी खरे तर ऐतिहासिकच ठरली आहे . त्यामुळे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह नांदेड पोलिसांचे मनापासून जाहीर अभिनंदन.
यानंतर एक चिंतन…
एप्रिल महिना हा खरे तर अनेक सण उत्सवाचा महिना . यावर्षी याच महिन्यात मुस्लिम बांधवांची पवित्र रमजान ईद , याच महिन्यात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांची जयंती , याच महिन्यात स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. एवढेच नाही तर बजरंग बली हनुमान यांचीही जयंती याच महिन्यात आहे. त्यामुळे एप्रिल महिना हा सांस्कृतिक आणि धार्मिक रित्या अत्यंत महत्त्वाचा राहिला आहे.
मुस्लिम बांधवांची पवित्र ईद नुकतीच साजरी झाली. ईद सणाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागले नाही. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही . याबद्दलही नांदेड पोलिसांचे आणि तमाम जनतेचे आभार मानलेच पाहिजेत . त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी प्रभू रामचंद्र यांची जयंती आज साजरी झाली. ईद साजरी करत असताना नांदेड शहरातील कोणत्याही भागात बॅरिकेटचे एक लाकूड ही बांधण्यात आलेले नव्हते. तरीही कुठेही कसल्याही प्रकारचा वादविवाद झाला नाही. आज रामनवमीनिमित्त अर्धे नांदेड शहर बॅरिकेट ने बंद करण्यात आले होते. मुस्लिम गल्ल्या बॅरिकेट्स ने अडवल्या गेल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीचा , रहदारीचा प्रश्नही बऱ्याच वेळा निर्माण झाला. बॅरिकेट्स बांधूनही पोलीस प्रशासनावर एक अप्रत्यक्ष ताण आज दिवसभर जाणवला. राम जन्मोत्सवाची तयारी करण्यासाठी या महिन्यात शांतता कमिटीच्या बैठकाही पार पडल्या. परंतु अशा शांतता कमिटीच्या बैठका पार पाडूनही जर प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आम्हाला मुस्लिम बांधवांच्या गल्ल्या बॅरिकेट्स ने पॅक करून काढाव्या लागत असतील तर ते आमचे सपशेल अपयश आहे . जिल्हा प्रशासन , पोलीस प्रशासनही यात अपयशी ठरले असे म्हणावेच लागेल . कारण आम्ही दोन्ही समाजामध्ये सुसंवाद निर्माण करण्यास कमी पडलो हे मान्य करावे लागेल.
असे बॅरिकेट्स गेले अनेक वर्षापासून बांधले जातात . खरे तर नांदेड शहरात आणि जिल्ह्यात इतकी विस्फोटक परिस्थिती आहे का ? असेल तर संबंधितांना ताब्यात घ्यायला हवे. अशा लोकांना हद्दपार का करू नये ? दोन समाजात सुसंवाद घडवून का आणला जात नाही ? याचाही विचार करावा लागेल. दक्षता म्हणून किंवा काळजी म्हणून हे बॅरिकेट्स बांधली गेली असतील याची जाणीव जरी आपण बाळगली तरी वारंवार असे बॅरिकेट्स बांधणे म्हणजे कुणाच्यातरी मनात कायमस्वरूपी राग निर्माण करणे होय या मानसशास्त्रीय तत्त्वाचाही विचार करावा लागेल. विशिष्ट अशा गल्ल्या दरवर्षी बॅरिकेट्स बांधून बंद करायच्या आणि जयंती साजरी करायची यात नियोजनाचा ‘ राम ‘ उरला नाही हेही तेवढेच खरे . एकीकडे विस्फोटक वातावरण आहे असे भासवायचे आणि दुसरीकडे सर्वधर्मसमभावाच्या गप्पा मारायच्या या भूमिकेला आता समजून घ्यावे लागेल आणि यात सुधारणा करावी लागेल.
आजची पिढी जी आता वयात येत आहे , त्या पिढीच्या मनात आम्ही जात , धर्म इतका ठासून भरत आहोत की उद्याचा भारत कसा असेल याची कल्पना न केलेली बरी. जे पेराल ते उगवते असे म्हणते , मग आज जे विष आम्ही एकमेकांच्या मनात पेरत आहोत त्याची फळं कशी असतील याचा विचार करणेही आवश्यक आहे असे वाटते.
काही वर्षापूर्वी जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी होतीच. तिचे समर्थन होऊच शकत नाही. परंतु त्यानंतर कित्येक वर्ष तीच मानसिकता कायम असेल असे गृहितक धरणे संयुक्तिक आहे असे वाटत नाही.बरे हा प्रकार कधी तरी ,कुठे तरी थांबायला हवाच ना ? मग तो कोण थांबविणार ? लोकप्रतिनिधी ? प्रशासन ? की जनता ?
आम्ही माणूस आहोत ही भावना मुळात रुजविण्याची गरज निर्माण झाली आहे. या अमुक धर्माचा माणूस आहे ही मानसिकता बदलावी लागेल तरच असे बॅरिकेट्स लावण्याची वेळ येणार नाही. अन्यथा पिंजऱ्यातल्या पोपटाप्रमाणे आपण आपला आनंद कायम साजरा करत राहू .ज्यात खरा आनंद आणि खरा ‘ राम ‘ ही असणार नाही याची चिंतन होणे अत्यावश्यक आहे असे वाटते.
आमच्या महामानवांच्या , आमच्या प्रतीकांच्या, आमच्या आदर्शांच्या आगामी काळात मुक्त वातावरणात जयंती निघाल्या पाहिजेत. प्रत्येकाला यात सहभागी होता आले पाहिजे. कुणाचाही मानसिक श्वास गुदमरणार नाही . एक प्रेमाचे , एकतेचे वातावरण निर्माण होईल यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे .असे वाटते.
पुन्हा एकदा पोलिस प्रशासनाचे अभिनंदन आणि आभारही.
राम तरटे
Leave a Reply