नांदेड(प्रतिनिधी)-सन 2016 ते 2019 या काळामध्ये तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरुद्वारा नांदेडमध्ये अखंड पाठसाहिब या सेवेमध्ये झालेल्या अफरातफरी प्रकरणी आज स्थानिक गुन्हा शाखेने मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. या सेवा प्रकरणात 36 लाख 69 हजार 350 रुपयांची अफरातफर झाली होती. या प्रकरणात तीन आरोपींना जामीन मिळालेला आहे. या प्रकरणाची तक्रार सिख नागरीक जगदीपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांनी केली होती.
दि.17 जुलै 2024 रोजी सरदार जगदीपसिंघ नंबरदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अखंड पाठसाहिब ही एक सेवा असते. त्यासाठी सिख भाविक गुरुद्वारा बोर्डाकडे पैसे जमा करतात आणि त्यानंतर त्या पाठविकांना त्या सेवेचा लाभ मिळतो. सन 2016 ते 2019 दरम्यान या सेवेमध्ये त्रुटी आहेत. तेथे अफरातफर झाली आहे अशा तक्रारी अनेक सिख भाविकांनी केल्या. त्यानंतर एक चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. या चौकशी समितीने महिपालसिंघ कृपालसिंघ लिखारी, धर्मसिंघ मोहनसिंघ झिलदार, रविंद्र हजुरासिंघ बुंगई आणि ठाणसिंघ जीवनसिंघ बुंगई हे चौघे दोषी असल्याचा अहवाल दिला.
त्यानंतर जगदीपसिंघ नंबरदार यांनी दिलेल्या 15 जुलै 2024 रोजीच्या तक्रारीनुसार वजिराबाद पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406 आणि 34 नुसार चार जणांविरुध्द गुन्हा क्रमांंक 330/2024 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे होता. आज स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना महिपालसिंघ लिखारी कोठे आहे याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या विभागातील सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल घोगरे पाटील आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांना तेथे पाठविले. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने महिपालसिंघ लिखारीला ताब्यात घेतले असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
Leave a Reply