नांदेड, (प्रतिनिधी)-सोशल मिडीया आणि फेसबुकच्या माध्यमातून सर्व जुन्या मित्रांना एकत्र आणून त्यांचा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्याची परंपरा सुरु असतानाच नांदेडच्या पिपल्स कॉलेजमधील १९८४ च्या वाणिज्य शाखेच्या बॅचमधील राज्यभरातील सर्व विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी आनंद सोहळा साजरा केला.
नांदेड एज्युकेशन सोसायटी व पीपल्स कॉलेजच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त पीपल्स कॉलेजमधील वाणिज्य शाखेतील १९८४ च्या बॅचचे स्नेह मिलन कार्यक्रम काल संपन्न झाला असून, यावेळी अनेक विद्यार्थी उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर त्या वेळच्या विद्यार्थ्यांना शिकवलेले प्रा. डॉ.बी.बी. देशपांडे, प्रा.डॉ. तुळापूरकर, प्रा. दराडे, प्रा. नळगीरकर एक हे शिक्षकही उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवातीला शहीद दिनाच्या निमित्त शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सी.ए.डॉ.प्रवीण पाटील यांनी गतकालीन शैक्षणिक वैभवाच्या पार्श्वभूमीवर अलीकडील शिक्षण क्षेत्रातील अपप्रवृत्तींकडे उपस्थित यांचे लक्ष वेधले आणि नां. ए. सो.च्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारोहाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून यावे, असे निमंत्रण दिले.
माजी उपप्राचार्य प्रा. बी.बी देशपांडे यांनी १९८४ च्या बॅचचे विद्यार्थी सुधाकर पांढरे हे नांदेड महापालिकेचे पहिले महापौर झाले तर अजय आंबेकर हे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे सचिव झाले याचा आम्हा सर्व शिक्षकांना आनंद असल्याची भावना व्यक्त केली.
विद्यार्थ्यांपैकी सी.ए. फलोर, रणजीत धर्मापुरीकर, अंजली देशमुख यांनीही आपले अनुभव सांगितले. शेवटी अध्यक्षीय समारोपपर भाषणात प्राचार्य डॉ.आर. एम. जाधव यांनी पीपल्स कॉलेज आपली गुणात्मकता कायम राखून भौतिक बदल करत असल्याचे सांगितले. यावेळी सी.ए.फलोर यांनी २१ हजार रुपये तर दीपक शहा यांनी ११ हजार रुपये माजी विद्यार्थी मंडळासाठी देणगी म्हणून जाहीर केले. डॉ. प्रकाश नेहलानी व उपप्राचार्य डॉ.सचिन पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. बालाजी कोंम्पलवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. पीपल्स कॉलेज असोसिएशनचे प्रा. डॉ. अशोक शिद्धेवाड, प्रा.डॉ. राजेश सोनकांबळे आणि डॉ. बालाजी कोंम्पलवार हे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. इतक्या वर्षानंतर हि सर्व मित्रमंडळी एकत्र भेटल्याने सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आज सर्वांनी पुन्हा एकदा आपण भेटूया असा संदेश देवून या स्नेहसंमेलन सोहळ्यातून निरोप घेवून आपापल्या गावी परतले
.
Leave a Reply